बीड : बीड मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड हा सध्या जेलमध्ये आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो समोर आल्यानंतर धनंजय मुंडे यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. अशातच बीडचे निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले यांनी वाल्मिक कराडचा एन्काऊंटर करण्याचा प्रयत्न धनंजय मुंडे यांनी केला आहे. यासाठी पाच कोटी, दहा कोटी आणि 50 कोटींची ऑफर दिल्याचा धक्कादायक आरोप रणजित कासले यांनी व्हिडीओच्या माध्यमातून केला आहे. यासंदर्भात करुणा शर्मा यांना प्रश्न विचारला असता त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर खळबळजनक आरोप केले आहेत. तसेच संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे दोषी आढळले तर त्यांनाही शिक्षा व्हायला हवी, असेही त्यांनी म्हटले आहे. (Karuna Sharma said that if the CDR of Dhananjay Munde 11 mobile numbers is checked a fake list will come to light)
रणजित कासले यांच्या आरोपसंदर्भात प्रश्न करुणा शर्मा यांना विचारला असता, त्यांनी सांगितले की, मी कधीही माझ्या नवऱ्याची किंवा स्वत:च्या मुलाची पाठराखण करणार नाही. संतोष देशमुख हत्येप्रकरणी धनंजय मुंडे हे दोषी आहेत, असं कधीही मी म्हटलेलं नाही. पण कदाचित ते दोषी ठरू शकतात. कारण त्यांच्या बंगल्यावर आवादा कंपनीची बैठक झाली होती. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे. तसेच धनंजय मुंडे यांच्याकडे 11 मोबाइल क्रमांक आहेत आणि त्या क्रमांकाची माहिती माझ्याकडे आहे. या सर्व मोबाइल क्रमांकाचा सीडीआर काढावा. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धनंजय मुंडेंचे 11 मोबाइल क्रमांक हवे असतील तर मी त्यांना ते द्यायला तयार आहे, असा दावा करुणा शर्मा यांनी केला.
हेही वाचा – Cabinet Decisions : अभय योजना लागू होणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत सात महत्त्वाचे निर्णय
करुणा शर्मा म्हणाल्या की, 2022 साली मी सीबीआयमध्ये धनंजय मुंडेंच्या सर्व मोबाइल क्रमांकाची तक्रार केली होती. या मोबाइल क्रमांकाचा व्हॉट्सअॅप तसेच सीडीआर काढा, अशी मागणी मी त्यावेळी केली होती. सर्व गोष्टींचा तपास व्हायला हवा. त्यानंतर संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे दोषी आढळले तर त्यांनाही शिक्षा व्हायला हवी. कारण धनंजय मुंडे यांचे सर्व काळे कारनामे या 11 मोबाइल क्रमांकातून होतात. 11 मोबाईल क्रमांक सोबत ठेवणे ही छोटी गोष्ट नाही. मी त्यांची पत्नी आहे. त्यामुळे या मोबाइल क्रमांकांवरून त्यांनी माझ्याशीही कधीकधी संवाद साधला आहे, असा खुलासाही करुणा शर्मा यांनी केला.
हेही वाचा – Ladki Bahin Yojana : महिलांना 500 रुपये मिळणार ही अफवा; राज्यमंत्र्यांनी 2100 रुपयांबाबतही दिली माहिती