आयपीएलच्या 18 व्या मोसमातील 34 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध पंजाब किंग्स आमनेसामने आहेत. या सामन्याचं आयोजन हे एम चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळुरु येथे करण्यात आलं आहे. या सामन्याला नियोजित वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणं अपेक्षित होतं. मात्र पाऊस आणि ओल्या खेळपट्टीमुळे सामन्याला तब्बल 2 तास 15 मिनिटांच्या विलंबाने सुरुवात होणार आहे. सामना 9 वाजून 45 मिनिटांनी सुरु होणार आहे.त्याआधी 9 वाजून 30 मिनिटांनी टॉस झाला. पंजाब किंग्सच्या बाजूने नाणेफेकीच कौल लागला. पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यर याने टॉस जिंकून बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे बंगळुरु घरच्या मैदानात किती धावा करणार? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
पाऊस आणि ओल्या खेळपट्टीमुळे 2 तास आणि 15 मिनिटांचा वेळ वाया गेला. त्यामुळे 6 ओव्हर कापण्यात आल्या आहेत. त्यामुळे 20 ऐवजी आता 14 षटकांचा सामना होणार आहे.
पंजाब किंग्सने या 14 षटकांच्या सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये बदल केला आहे. कर्णधार श्रेयस अय्यर याने ऑलराउंडर ग्लेन मॅक्सवेल याच्या जागी मार्कस स्टोयिनस याला संधी दिली आहे. तसेच हरप्रीत ब्रार यालाही संधी मिळाली आहे. तर दुसर्या बाजूला आरसीबीने प्लेइंग ईलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही. कर्णधार रजत पाटीदारने आपल्या त्याच खेळाडूंवर विश्वास दाखवला आहे.
दरम्यान आरसीबी आणि पंजाब या दोन्ही संघांचा हा या मोसमातील सातवा सामना आहे. आरसीबीने या आधीच्या 6 पैकी 4 सामने जिंकले आहेत. तर आरसीबीला 2 वेळा पराभूत व्हावं लागलं आहे. तर पंजाबचीही आरसीबीसारखीच स्थिती आहे. मात्र आरसीबी पॉइंट्स टेबलमध्ये तिसऱ्या स्थानी आहे. तर पंजाब चौथ्या क्रमांकावर आहे. आरसीबीचा नेट रनरेट हा +0.672 असा आहे. तर पंजाबचा नेट रनरेट हा +0.172 इतका आहे.
14 ओव्हरचा गेम होणार, पावसामुळे 6 षटकं पाण्यात
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू प्लेइंग ईलेव्हन : फिलिप सॉल्ट, विराट कोहली, रजत पाटीदार (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (विकेटकीपर), टीम डेव्हिड, कृणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, जोश हेजलवुड, सुयश शर्मा आणि यश दयाल.
पंजाब किंग्ज प्लेइंग ईलेव्हन : प्रियांश आर्य, नेहल वढेरा, श्रेयस अय्यर (कर्णधार), शशांक सिंग, जोश इंग्लिस (विकेटकीपर), मार्कस स्टॉइनिस, मार्को जॅनसेन, हरप्रीत ब्रार, झेवियर बार्टलेट, अर्शदीप सिंग आणि युझवेंद्र चहल.