ठाकरे गटाने शेअर केला राज ठाकरेंचा मातोश्रीबाहेरचा ‘तो’ फोटो, आता वेगळ्या चर्चांना उधाण!
GH News April 19, 2025 08:09 PM

Raj Thackeray And Uddhav Thackeray : आमच्यातील भांडणं फार छोटी आहेत. महाराष्ट्र मोठा आहे, असे म्हणत राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी युती होऊ शकते, असे संकेत दिले आहेत. उद्धव ठाकरे यांनीदेखील यावर सकारात्मक भूमिका घेतली आहे. त्यामुळेच आता भविष्यात राज्याच्या राजकारणाची दिशा बदलणार का? असे विचारले जात आहे. दरम्यान, या युतीसंदर्भात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलेला असताना उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने एक खास फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हस्तांदलोन करताना दिसतायत.

नेमका कोणता फोटो शेअर केला?

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाने एक्स या समाजमाध्यमावर एक फोटो आणि फोटोसोबत एक व्हिडीओ क्लिप शेअर केली आहे. या फोटोमध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र दिसत आहेत. विशेष म्हणजे हे दोघेही एकमेकांना हस्तांदलोन करताना दिसतायत. त्यांच्यासोबत इतरही काही नेतेमंडळी दिसत आहेत. या फोटोत दोन्हीही ठाकरे बंधू एकमेकांकडे पाहून स्मितहास्य करत आहेत. याच फोटोची सध्या सगळीकडे चर्चा आहे.

व्हिडीओमध्ये नेमकं काय आहे?

राज ठाकरे यांनी आमच्या भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे, असे विधान केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी भाष्य केलं आहे. त्याचाच फोटो ठाकरे गटाने एक्स समाजमाध्यमावर शेअर केलाय. “माझी कुणाशी भांडणं नव्हतीच पण ती छोटीमोठी भांडणं मिटवायला मिही तयार आहे. मराठीसाठी तसेच मराहाराष्ट्राच्या हितासाठी ही भांडणं बाजूला ठेवायला मी तयार आहे. लोकसभेच्या निवडणुकीत मी सांगत होतो की ते महाराष्ट्रातील सगळे उद्योगधंदे गुजरातमध्ये घेऊन जात आहेत, तेव्हाच विरोध केला असता तर राज्यात आणि केंद्रात महाराष्ट्राच्या हिताचा विचार करणारं सरकार बसलं असतं. त्यावेळेले काळे कामगार कायदे आपण फेकून दिले असते. एकत्र यायला तयार पण महाराष्ट्राच्या हिताच्या आड जो येईल त्याला मी घरी बोलवणार नाही, त्याच्या घरी मी जाणार नाही. त्यांच्या पंक्तीला बसणार नाही, हे आधी ठरवा,” असे उद्धव ठाकरे या व्हिडीओत बोलताना दिसतायत.

दरम्यान, ठाकरेंच्या युतीवरील विधानानंतर आता ठाकरेंच्या शिवसेनेने सकारात्मक भूमिका दाखवली आहे. आम्ही त्यांच्या विधानाला सकारात्मक भूमिकेतून पाहतोय, असं ठाकरे गटातर्फे संजय राऊतांनी स्पष्ट केलंय. त्यामुळे आता आगामी काळात नेमकं काय होणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.