इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत शनिवारी (१९ एप्रिल) गुजरात टायटन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात सामना होत आहे. हा सामना गुजरातच्या घरच्या मैदानात नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जात आहे.
पण हा सामना दुपारी खेळवला जात असल्याने भारतात वाढलेली उष्णता ही मोठी समस्या आहे. अशात गुजरात टायटन्सने एक मोठा निर्णय जाहीर केला होता. पण त्यावर आता टीकाही होताना दिसत आहेत.
शनिवारी दुपारी ४० डिग्री सेल्सियसच्या जवळपास तापमान आहे. त्यामुळे मोफत पाणीस सनस्क्रीन आणि ओआरएस देण्याची घोषणा सामन्यापूर्वी केली होती. त्यामुळे चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. कारण स्टेडियममध्ये पाण्याच्या बाटल्या किंवा कोणतेही खाद्यपदार्थ घेऊन जाण्याची परवानगी नाही.
अशात रखरखत्या उन्हात गुजरातच्या मॅनेजमेंटने घेतलेला हा निर्णय महत्त्वाचा मानता जात आहे. नरेंद्र मोदी स्टेडियम हे जगातील सर्वात मोठे स्टेडियम आहे. या स्टेडियममध्ये १ लाखाहून अधिक प्रेक्षकांना हजर राहाता येते. अशात गुजरातने दिलेल्या या सुविधांबद्दल कौतुक होत आहे.
मात्र, ज्यावेळी सामना सुरू झाला, त्यावेळी चाहत्यांना वेगळाच अनुभव आल्याच दिसून आले आहे. काही सोशल मिडिया युझर्सने असा आरोप केला आहे की मोफत पाणी केवळ प्रेवशाच्या इथे देण्यात येत होते. पण स्टँड्समध्ये मोफत पाणी नाही.
तसेच कर्मचाऱ्यांकडून याबाबत स्पष्टीकरण देण्यात येत नाहीये. आता याबाबत अद्याप तरी गुजरात टायटन्सने कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण दिलेले नाही.
दरम्यान, सामन्याबद्दल सांगायचे झाले, तर गुजरातने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर गुजरातने प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल केलेला नाही. दिल्ली संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये जॅक फ्रेझर मॅकगर्कला संघातून बाहेर केले आहे. इशान पोरेलला या सामन्यासाठी संघात स्थान दिले आहे.
प्लेइंग इलेव्हनदिल्ली कॅपिटल्स : अभिषेक पोरेल, करुण नायर, केएल राहुल (यष्टीरक्षक), ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल (कर्णधार), आशुतोष शर्मा, विपराज निगम, मिचेल स्टार्क, कुलदीप यादव, मोहित शर्मा, मुकेश कुमार
गुजरात टायटन्स : साई सुधारसन, शुभमन गिल (कर्णधार), जोस बटलर (यष्टीरक्षक), शाहरुख खान, राहुल तेवतिया, रशीद खान, अर्शद खान, रविश्रीनिवासन साई किशोर, प्रसीध कृष्णा, मोहम्मद सिराज, इशांत शर्मा