देशातील 17 राज्यांमधील वादळ चेतावणी
Marathi April 14, 2025 03:36 PM

राजस्थानात दोघांचा मृत्यू : सहा राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

हवामान खात्याने रविवारी मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश आणि बिहारसह 17 राज्यांमध्ये पाऊस आणि वादळाचा इशारा जारी केला आहे. राजस्थानमध्ये धुळीच्या वादळाचा इशारा देण्यात आला आहे. याचा परिणाम दिल्लीपर्यंत जाणवणार आहे. 15 एप्रिलनंतर राजस्थान, पंजाब, हरियाणा, दिल्ली, मध्यप्रदेश आणि उत्तर प्रदेशात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. या काळात तापमान 40 अंशांपेक्षा जास्त असू शकते.

राजस्थानमध्ये रविवारी वीज कोसळून आणि वादळामुळे दोघांचा मृत्यू झाला. शेतात काम करणाऱ्या एका महिलेचा वीज पडून जागीच मृत्यू झाला, तर तीन गंभीर जखमी झाले आहेत. तसेच सिरोहीमध्ये रात्री उशिरा आलेल्या जोरदार वादळामुळे झाड पडून एका महिलेला आपला जीव गमवावा लागला.

पुढील 24 तासात उत्तर प्रदेशातील 47 जिह्यांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच विजांसह गारपीट होण्याची शक्यता आहे.  बिहारमधील 24 जिह्यांमध्ये वादळ आणि पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच मध्यप्रदेशातील 24 जिह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे.

येत्या दोन-तीन दिवसात उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, हरियाणा, पंजाब, हिमाचल प्रदेश या राज्यांमध्ये विजांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. डोंगराळ भागात गारपीट होण्याची शक्यता आहे. पश्चिम राजस्थानमध्ये 14 आणि 15 एप्रिल रोजी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील मैदानी भागात मेघगर्जनेसह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. या काळात वाऱ्याचा वेग ताशी 40 ते 50 किमी राहील. अरुणाचल प्रदेश, ओडिशा, आसाम, मेघालय या राज्यांमध्ये 15 एप्रिलपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा जारी करतानाच जोरदार वादळाचा संभाव्य धोकाही वर्तवण्यात आला आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.