नामपूर- मुंगसे (ता. बागलाण) येथील शनिवारी (ता. १३) मध्यरात्रीच्या सुमारास माती घेऊन येणाऱ्या हायवा ट्रकने मातीच्या ढिगाऱ्यावर झोपलेल्या दोघा सख्ख्या भावांना चिरडल्याने दोघा भावांचा जागीच करुण अंत झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. ट्रकचालक फरार असून जायखेडा पोलिस ट्रक चालकाचा शोध घेत आहेत.
मातीने भरलेला हायवा ट्रक पाठीमागे घेताना मागील चाकाखाली चिरडल्याने हा अपघात घडला. घटनेची माहिती कळल्यानंतर नातेवाइकांनी हंबरडा फोडला. जायखेडा पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी, मुंगसे गावालगत एका वीटभट्टीवर कामासाठी शिरपूर येथील मजूरी करणारे उन्हाळ्याचे दिवस असल्याने मातीच्या ढिगाऱ्यावर किशोर पुण्या कोकणी (वय १९) व काळू पुण्या कोकणी (वय १७) हे दोघे सख्खे भाऊ झोपले होते.
मध्यरात्रीच्या सुमारास मातीने भरलेला हायवा ट्रक (एमएच ४१, एटी ७१७२) चालक मागे घेत असताना ढिगाऱ्यावर झोपलेले दोघे सख्खे भाऊ चाकाखाली चिरडले गेल्याने जागीच मृत पावले. घटना लक्षात येताच ट्रक चालक गाडी सोडून पसार झाला. जायखेडा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर काळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
जायखेडा पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला. नाना उत्तम कोळी (वय ४५) यांनी फिर्याद दिली. चालक धनंजय शांताराम जाधव (रा. मुंजवाड) फरार आहे. हवालदार पी. एन. क्षीरसागर तपास करीत आहे. दोघ भावांचे सटाणा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात येऊन मृतदेह नातेवाईकांकडे देण्यात आले.