हिंगणा : मार्गावर मोकाट सुटलेल्या गाईच्या धडकेत दुचाकीस्वार एका तरुण कामगाराचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी (ता.१३)सकाळी ७ वाजताच्या सुमारास हिंगणा मार्गावरील तलमले इस्टेटसमोर घडली.
सकाळी एका गाईच्या मागे सुसाट वेगाने तीन चार वळू पळत सुटले. त्यातील गाई थेट ॲक्टिवा मोपेडवर आदळली. यात त्या गाईचा सुद्धा मृत्यू झाला. लुकेश शमेलाल मरकाम (वय २२, श्रमिकनगर हरिगंगा ,एमआयडीसी, हिंगणा नागपूर) असे मृताचे नाव असून त्याच्या पाठीमागे बसलेला द्वारका यादव( २३, श्रमिकनगर) हा किरकोळ जखमी झाला.
दोघेही अमरनगरच्या बाजूला असलेल्या बजाज स्टील कंपनीत कामाला होते. सकाळ पाळी असल्याने लुकेश हा स्कूटरवर मागे द्वारका याला बसवून हिंगण्याच्या दिशेने जात असताना गाय व त्यामागे असलेले वळू समोरून त्याच्या गाडीला भिडले. यात लुकेशच्या डोक्यावर, छातीला जबर मार लागला व तो जागेवर बेशुद्ध पडला. गायसुद्धा तिथेच कोसळली.