आयपीएलच्या 18 व्या मोसमातील 31 व्या सामन्यात मंगळवारी पंजाब किंग्स विरुद्ध गतविजेता कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात लढत होणार आहे. हा सामना मंगळवारी 15 एप्रिलला महाराजा यादवेंद्र सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, मुल्लानपूर येथे होणार आहे. या सामन्यानिमित्ताने मुंबईसाठी एकत्र फर्स्ट क्लास क्रिकेट खेळणारे 2 सहकारी खेळाडू आमनेसामने येणार आहेत. अजिंक्य रहाणे केकेआरचं नेतृत्व करणार आहे. तर श्रेयस अय्यरकडे पंजाबच्या कर्णधारपदाची धुरा आहे. त्यामुळे कर्णधार म्हणून कोण यशस्वी ठरणार? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे. या सामन्यातील जय पराजयावर गुणतालिकेतील चित्र बदलणार हे निश्चित आहे. कारण दोन्ही संघ सध्या टॉप 4 मध्ये स्थान मिळवण्यासाठी धडपड करत आहेत. विजयी संघाला नक्कीच फायदा होणार आहे.
केकेआरने पंजाबच्या तुलनेत या मोसमात 1 सामना जास्त खेळला आहे. पंजाब किंग्सचा हा सहावा तर कोलकाताचा हा सातवा सामना असणार आहे. मात्र दोन्ही संघांनी समसमान सामने जिंकले आहेत. पंजाब आणि केकेआरने प्रत्येकी 3 सामन्यात यश मिळवलं आहे. पंजाबला 2 सामन्यात पराभूत व्हावं लागलं आहे. तर केकेआरने 3 सामने गमावले आहेत. केकेआरच्या तुलनेत पंजाबने 1 सामना कमी गमावला आहे. मात्र त्यानंतरही केकेआर पॉइंट्स टेबलमध्ये आघाडीवर आहे. त्याचं कारण म्हणजे नेट रनरेट.
ताज्या आकडेवारीनुसार, केकेआरने 6 पैकी 3 सामने जिंकले आहेत. केकेआरचा नेट रनरेट हा +0.803 असा आहे. कोलकाता पॉइंट्स टेबलमध्ये पाचव्या स्थानी आहे. तर पंजाबने 5 पैकी 3 सामने जिंकलेत तर 2 सामने गमावले आहेत. त्यामुळे पंजाबचा नेट रनरेट हा +0.065 असा आहे.
आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत उभयसंघात एकूण 33 सामने खेळवण्यात आले आहेत. केकेआरने या पैकी सर्वाधिक सामने जिंकले आहेत. केकेआरने 33 पैकी 21 सामन्यात विजय मिळवला आहे. तर पंजाबने 12 वेळा पलटवार करत केकेआरला धोबीपछाड दिला आहे. तसेच दोन्ही संघात आतापर्यंत मुल्लानपूरमध्ये एकदाही सामना खेळवण्यात आलेला नाही. तसेच उभयसंघात गेल्या 5 सामन्यांपैकी पंजाबने 3 सामन्यांत विजय मिळवला आहे. तर केकेआरला 2 वेळाच जिंकण्यात यश आलं आहे.