नांदिवडे अंबुवाडीतील गॅस टर्मिनलला विरोध, जिंदाल कंपनीविरोधात बेमुदत धरणे आंदोलन सुरू
Marathi April 14, 2025 09:28 PM

डिसेंबर महिन्यात झालेली वायुगळतीची घटना ताजी असतानाच जिंदाल कंपनी नांदिवडे अंबुवाडी फाट्यावर गॅस साठवणूक करण्यासाठी लोकवस्तीमध्ये गॅस टर्मिनल उभारत आहे. हा ग्रामस्थांच्या जीवाशी खेळ सुरू असून गॅस टर्मिनलच्या विरोधात प्रदूषण विरोधी संघर्ष कृती समितीने ग्रामस्थांसह भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून आजपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे.

12 डिसेंबर रोजी जिंदाल पोर्टमधून वायुगळती होऊन माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना त्रास झाला होता. ही घटना ताजी असतानाच जिंदाल कंपनी गॅस साठवण करण्यासाठी नांदिवडे अंबुवाडी येथे गॅस टर्मिनल उभारत आहे. या गॅस टर्मिनलविरोधात प्रदूषण विरोधी संघर्ष कृती समितीने बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनासाठी आंदोलनासाठी ॲड.असीम सरोदे, माजी मंत्री बच्चू कडू, ॲड.महेंद्र मांडवकर आणि ॲड.रोशन पाटील यांचे सहकार्य लाभले असल्याचे प्रदूषण विरोधी संघर्ष कृती समिती नांदिवडेने सांगितले.

जिंदाल कंपनी ग्रामस्थांच्या जीवाशी खेळतेय

जिंदाल पोर्टमधून झालेल्या वायुगळतीमुळे माध्यमिक विद्यामंदिर मधील 75 हून अधिक विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली होती. सुरूवातीला त्या विद्यार्थ्यांना रूग्णालयात नेण्याकरिताही कंपनी प्रशासन पुढे आले नव्हते. प्रशासन आणि ग्रामस्थांच्या दबावानंतर वैद्यकीय उपचाराची जबाबदारी जिंदाल कंपनीने घेतली होती. त्यानंतर अंबुवाडी येथे गॅस टर्मिनल उभारण्यात येणार आहे. ही कंपनी आमच्या जीवाशी खेळत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.