उंदरांमुळे होणाऱ्या त्रासाबद्दल आपण नेहमीच ऐकतो, पण हे छोटे जीव केवळ अन्नसामग्री कुरतडणं, कपडे खराब करणं किंवा स्वयंपाकघरात घुसणं इतक्यापुरते मर्यादित नाहीत. जागतिक उंदीर दिनाच्या निमित्ताने एक अत्यंत महत्त्वाची बाब समोर येतेय – उंदरांमुळे पसरणाऱ्या गंभीर आजारांची. विशेष म्हणजे, घरात उंदीर मेला तरी धोका कमी होत नाही, उलट तो अधिक वाढतो.
अनेकदा उंदीर घरात एखाद्या कोपऱ्यात मरण पावतो, आणि त्यातून येणारा दुर्गंधीचा त्रास तर असतोच. पण त्यासोबतच घरातील हवेमध्ये घातक विषाणू आणि जिवाणू मिसळण्याची शक्यता वाढते. त्यामुळे असे उंदीर केवळ अप्रिय वासाचं नव्हे, तर घातक आजारांचंही कारण ठरू शकतात.
घर कितीही स्वच्छ ठेवले, तरी उंदीर नाल्यांमधून, संडासातून किंवा इतर अस्वच्छ जागांतून घरात प्रवेश करतात. आणि एकदा घरात शिरल्यानंतर ते आपल्या घरातल्या अन्नपदार्थांपासून ते कपाटांपर्यंत सर्वत्र पोहोचतात. अशा वेळी केवळ साफसफाई पुरेशी ठरत नाही, तर उंदरांपासून दूर राहण्यासाठी अधिक जागरूकता आणि खबरदारी आवश्यक ठरते.
उंदराच्या चाव्यामुळे किंवा त्याच्या मूत्र, मलाच्या संपर्कातून हा जीवघेणा आजार होतो. ताप, अंगदुखी, थकवा अशी लक्षणं दिसतात. लहान मुलं, ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असते, त्यांच्यासाठी हा आजार अधिक धोकादायक ठरतो.
हा आजार उंदराच्या मूत्रामुळे पसरतो आणि विशेषतः पावसाळ्यात अधिक प्रमाणात आढळतो. ताप, स्नायू दुखणं, उलट्या अशी लक्षणं असतात. गंभीर अवस्थेत हा आजार किडनी फेल होण्यास कारणीभूत ठरतो. त्यामुळे उघड्या पाण्यातून चालणं आणि भिजलेलं अन्न खाणं टाळणं आवश्यक आहे.
इतिहासातील जीवघेण्या साथीपैकी एक असलेला प्लेग देखील उंदरांमुळेच पसरतो. ताप, थकवा आणि घाम येणं ही लक्षणं असतात. याशिवाय, क्षयरोग म्हणजेच टीबी देखील उंदरांच्या मल-मूत्रातून पसरू शकतो, आणि फुफ्फुसांवर थेट परिणाम करतो. त्यामुळे घरातील स्वच्छता राखणं अत्यावश्यक आहे.
उंदीर घरात शिरू नयेत यासाठी नाल्यांचे झाकण लावणे, अन्न झाकून ठेवणे, घराच्या कोपऱ्यांत नियमितपणे फिनाईल/डिटॉलने स्वच्छता करणे, आणि मृत उंदराला स्पर्श करताना हातमोजे वापरणं गरजेचं आहे. जागरूक राहूनच आपण या अदृश्य संकटाला टाळू शकतो.