बँकांचे कर्ज बुडवून फरार असलेला हिरे व्यापारी मेहुल चोक्सीला बेल्जियममध्ये अटक करण्यात आलीय. भारतीय तपास यंत्रणांकडून प्रत्यार्पणाची मागणी केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. चोक्सीवर पंजाब नॅशनल बँकेत १३ हजार कोटींच्या कर्ज घोटाळ्याचा आरोप आहे. या प्रकरणी मेहुल चोक्सीचा भाचा आणि हिरे व्यापारी नीरव मोदी हासुद्धा संशयित आरोपी आहे.
चोक्सी वैद्यकीय उपचारासाठी बेल्जियमला गेला होता. तिथं उपचाराच्या नावाखाली तो स्वित्झर्लंडला पळून जाण्याची तयारी करत होता. चोक्सीला कॅन्सर झाला असून हिर्सलँडन क्लिनिक आराऊ इथं उपचारासाठी जाण्याच्या प्रयत्नात होता. मात्र भारतीय तपास यंत्रणांनी त्याचा प्लॅन हाणून पाडला. भारत सोडल्यानंतर २०१८ पासून मेहुल चोक्सी अँटिग्वा इथं राहत होता.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अटकेनंतर कागदपत्रांची औपचारिकता पूर्ण केली जात आहे. कारण चोक्सी वैद्यकीय कारणाच्या आधारे जामीन मागू शकतो. चोक्सीचे वकील विजय अग्रवाल यांनी सांगितलं की, चोक्सीला शनिवारी पोलिसांनी ताब्यात घेतलं. तो सध्या तुरुंगात आहे आणि जामीनासाठी अर्ज करू शकत नाही. पण याचिका दाखल करू शकतो. त्यात ताब्यात ठेवू नये अशी विनंती केली जाऊ शकते. प्रत्यार्पणाला विरोध करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी चोक्सीने केलीय.
दरम्यान, चोक्सीला कॅन्सर झालाय. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. त्यामुळे अपील करण्यासाठी हेच कारण असेल की कॅन्सरवर उपचार केले जात आहेत आणि त्यामुळे पळून जाण्याचा धोका नाही असंही वकिलांनी सांगितलं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मेहुल चोक्सीविरोधातील इंटरपोल रेड नोटिस हटवली होती. तेव्हापासूनच भारतीय तपास यंत्रणा प्रत्यार्पणाच्या माध्यमातून त्याला भारतात आणण्याच्या प्रयत्नात होत्या.