Thieves in Nashik, Pune; Gang arrested, stolen bikes, jewellery seized
Marathi April 15, 2025 02:53 PM


नाशिक । दुचाकी चोरी करून नाशिक शहरासह पुणे जिल्ह्यातील दौंड, पिंपरी-चिंचवड, चंदनगर येथे महिलांचे दागिने चोरी करणाऱ्या सराईत चोरट्यांच्या टोळीच्या गंगापूर पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. संशयितांमध्ये एक सराफ व्यावसायिक आहे. विशेष म्हणजे, या टोळीमध्ये तीन अल्पवयीन मुले असून, पोलिसांनी त्यांनाही ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी गंगापूर, सरकारवाडा, इंदिरानगर, भद्र्काली, म्हसरूळ, दौंड, चंदननगर व पिंपरी-चिंचवड येथील गुन्हे उघडकीस आणले आहेत. पोलिसांच्या चोरट्यांच्या ताब्यातून चोरीच्या दोन दुचाकी व दागिने असा एकूण ११ लाख २३ हजार ६८८ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. (Thieves in Nashik, Pune; Gang arrested, stolen bikes, jewellery seized)

अक्षय सुनील बाेरकर (१९), राज सखाहरी गायकवाड (१९), परवेझ उर्फ सोनु जावेद मनियार (२४, तिघे रा. शिवाजी नगर) व विलास प्रमोद विसपुते (३९, रा. खुटवड नगर, नाशिक) अशी अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहेत.

गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत २९ मार्च २०२५ रोजी सायंकाळी सव्वासातच्या सुमारास शांतीनिकेतन चौक परिसरात महिलेच्या गळ्यातील दीड तोळे वजनाची सोन्याची पोत हिसकावून चाेरटे पसार झाले होते. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक जग्वेंद्रसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मोतीलाल पाटील यांच्या पथकाने या गुन्ह्याचा तपास सुरु केला. पथकाने तपास करीत चौघांना पकडले. तसेच तीन अल्पवयीन संशयितांनाही चाेरीच्या दुचाकींसह ताब्यात घेतले.

पोलीस तपासात संशयित राज याने म्हसरुळच्या हद्दीतून दुचाकी चोरली, तर अक्षय व अल्पवयीन मुलाने मिळून गंगापूर, इंदिरानगर पोलीस ठाण्यांच्या हद्दीत प्रत्येकी दोन, सरकारवाडा व भद्रकालीच्या हद्दीत प्रत्येकी एक जबरी चाेरीचा गुन्हा केल्याची कबुली दिली. त्याचप्रमाणे पुणे जिल्ह्यातील दौंड येथून दोन अल्पवयीन मुलांनी दुचाकी चोरली व त्याच दुचाकीचा वापर पुणे शहरात जबरी चोरीसाठी केल्याचेही उघड झाले. त्यामुळे या टोळीने नाशिक शहरात सात व पुणे जिल्ह्यात तीन गुन्हे केल्याचे उघड झाले आहे. या टोळीकडून पोलिसांनी दोन दुचाकी व सोन्याचे दागिने असा एकूण ११ लाख २३ हजार ६८८ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार रवींद्र मोहिते, गिरीष महाले, अंमलदार राकेश राऊत, मुकेश गांगुर्डे, मच्छिंद्र वाकचौरे, सोनू खाडे यांनी केली.



Source link

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.