‘समस्यांना तोंड देणे मला अवघड झाले आहे. तू आत्मविश्वासाने पुढे जा…’ असे म्हणत लाडक्या लेकीला आईची काळजी घेण्याचा सल्ला आपल्या मृत्यूपूर्वी चिठ्ठीत लिहून ठेवत एका फायनान्सचे काम करणाऱ्या ४५ वर्षीय व्यावसायिकाने पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. हा प्रकार रविवारी रात्री अडीच वाजता उघडकीस आला.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शारदाश्रम कॉलनीत राहणारे सुमेश सुरेश महाजन (४५) हे फायनान्सचे काम करत होते. त्यांचे स्वतःचे कार्यालय सूतगिरणी चौक परिसरात आहे. ते रविवारी कार्यालयात गेले होते. रात्री साडेनऊ वाजता त्यांनी मुलगी आरूषीला कॉल केला होता. त्यानंतर महाजन घरी न आल्याने कुटुंबातील सदस्य त्यांच्या कार्यालयात गेले. मात्र, कार्यालयात पाचव्या मजल्यावरून घेतली उडी महाजन नव्हते, तर त्यांचा मोबाईल तिथेच चार्जिंगला लावलेला होता. नातेवाईकांनी बाल्कनीतून खाली पाहिले असता, महाजन हे जखमी अवस्थेत आढळून आले. त्यांनी तात्काळ धाव घेऊन जखमी अवस्थेतील महाजन यांना घाटी रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच पुंडलिकनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे यांच्यासह पोलीस अधिकारी, अंमलदारांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असता महाजन यांच्या कार्यालयात एक सुसाईड नोट आढळली. या घटनेची पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यांच्या पार्थिवावर पुष्पनगरी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुली, दोन भाऊ असा परिवार आहे.
अभ्यास करून मोठी अधिकारी होशील…
महाजन यांनी मुलगी आयुषीसाठी सुसाईड नोट लिहून ठेवली होती. त्यात ‘आयुषी, तू माझी आवडती मुलगी आहेस. तू मला क्षमा कर. या समस्यांना तोंड देणे मला आता अवघड झाले आहे. बेटा, तू आत्मविश्वासाने पुढे जा. खूप अभ्यास करून मोठी अधिकारी होशील, असे तू वचन दिले आहेस. तुझ्या आईची काळजी घे…’ असा मजकूर लिहिला आहे.