आयपीएल 2025 स्पर्धेच्या 31व्या सामन्यात पंजाब किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स हे संघ आमनेसामने आले आहेत. पंजाब किंग्स संघ 15.3 षटकात 111 धावा करून बाद झाला आहे. केकेआरसमोर विजयासाठी 112 धावांचं सोपं आव्हान आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल पंजाब किंग्सच्या बाजूने लागला. कर्णधार श्रेयस अय्यरने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तर कोलकात्याच्या मनासारखं झालं. कर्णधार अजिंक्य रहाणेनं हवं तसं झाल्याचं सांगितलं. श्रेयस अय्यरने घेतलेला त्यांच्यावर उलटल्याचं दिसलं. मोठी धावसंख्या उभारतील असं वाटलं होतं. मात्र तसं काही झालं नाही. उलट एकापाठोपाठ एक धडाधड विकेट पडत गेल्या. प्रियांश आर्य आणि प्रभसिमरन सिंगने चांगली सुरुवात करून दिली आहे. पहिल्या विकेटसाठी 39 धावांची भागीदारी केली होती. पण त्यानंतर विकेट्सची रांग लागली. कर्णधार श्रेयस अय्यर आपलं खातंही खोलू शकला नाही. त्यानंतर आलेला जोश इंग्लिस 2 धावा करून बाद झाला. त्यामुळे संघावरील दडपण वाढत गेलं.
प्रभसिमरन सिंगने हे दडपण कमी करण्याचा प्रयत्न केला. मात्र तोही 15 चेंडूत 30 धावा करून बाद झाला. त्याने 2 चौकार आणि 3 षटकार मारले. हार्षित राणाने पंजाब किंग्सला पूर्णपणे बॅकफूटवर ढकललं. ग्लेन मॅक्सवेल या सामन्यातही फेल गेला. त्याचा खराब फॉर्म पंजाब किंग्सच्या चिंतेचा विषय असणार आहे. त्याला फक्त 7 धावा करता आल्या. सूर्यांश शेडगेकडूनही भ्रमनिरास झाला. त्याचा खेळही 4 धावांवर आटोपला. त्यामुळे पंजाब किंग्सची नाजूक स्थिती झाली.
शशांक सिंगने शेवटी काही फटके मारण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा डावही 18 धावांवर आटोपला. मार्को यानसेन 1 धावा करून सुनील नरीनच्या गोलंदाजीवर बोल्ड झाला. तर झेव्हियरहा धावचीत झाला आणि खेळ 111 धावांवर आटोपला. केकेआरकडून हार्षित राणाने 3, वरुण चक्रवर्तीने 2, सुनील नरीनने 2 विकेट घेतल्या. तर वैभव अरोरा आणि एनरिच नोर्तजेने प्रत्येकी 1 विकेट घेतली. कोलकात्यासमोर सोपं आव्हान आहे. त्यामुळे कोलकाता आरामात हा सामना जिंकेल अशी स्थिती आहे. आता पंजाबच्या गोलंदाजांवर मोठं दडपण असणार आहे.