सकाळ वृत्तसवा
नवी मुंबई, ता. १५ : ग्रामीण भागातील महिलांकडून चालवल्या जाणाऱ्या दुग्धव्यवसायांपासून ते शेतीसाठी उजाड जमीन सुपीक करण्यात आणि गावकऱ्यांना उद्योजक बनवण्यात दीपक फर्टिलायझर्स अँड पेट्रोकेमिकल्स कॉर्पोरेशन लिमिटेडने आपल्या ‘इशान्य फाउंडेशन’ या सीएसआर विभागाच्या माध्यमातून सन्मान आणि स्वावलंबनाचे महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. त्या अनुषंगाने तळोजा परिसरातील गावांमधील ग्रामस्थांच्या जीवनात आर्थिकदृष्ट्या सबलीकरणासाठी रोजगाराचे सकारात्मक प्रोत्साहन मिळाले आहे.
वर्षानुवर्षे दीपक फर्टिलायझर्सच्या तळोजा येथील कंपनीजवळील गावांमध्ये सीएसआरअंतर्गत विविध उपक्रमांद्वारे सर्वांगीण ग्रामीण विकासावर लक्ष केंद्रित केले आहे. चिंचवली गावात राहणाऱ्या मनीषा गोटीराम रिकामे यांचे संपूर्ण कुटुंब पतीच्या शेतीवर अवलंबून होते; परंतु दीपक फर्टिलायझर्सच्या दुग्धव्यवसाय विकास प्रकल्पात सहभागी झाल्यानंतर त्यांच्या परिस्थितीत आमूलाग्र बदल झाला. गायींची निगा, पोषण आणि प्रशिक्षणाच्या मदतीने त्यांनी आपल्या छोट्याशा गोठ्याला स्थिर उत्पन्नाचे साधन बनवले. खैरवाडी गावातील अल्पभूधारक शेतकरी कालीबाई आणि श्रावण भगत यांनी शेती सोडून देण्याचा विचार केला होता. त्यांना शेतातून पुरेशे उत्पन्न मिळत नव्हते. आता दीपक फर्टिलायझर्स राबवत असलेल्या ‘वाडी’ विकास उपक्रमातून त्यांना तांत्रिक मार्गदर्शन आणि सुधारित पद्धतींमुळे, त्यांच्या शेतातून होणारे उत्पन्न वाढताना दिसत आहे. नितलसच्या वसुधा वसंत पवार यांच्यासाठी आर्थिक स्वातंत्र्य ही एक दूरची कल्पना होती. दीपक फर्टिलायझर्सच्या मदतीने त्या एक लहान नाष्टा व चहा सेंटर उभारू शकल्या.
--------------------
मी पूर्णपणे माझ्या पतीच्या अनिश्चित उत्पन्नावर अवलंबून होते. जेव्हा दीपक फर्टिलायझर्सने आम्हाला दुग्धव्यवसाय प्रशिक्षण दिले आणि दुधाळ गायी खरेदी करण्यास मदत केली, तेव्हा सर्व काही बदलले. आता मी दररोज स्थानिक ग्राहकांना व खासगी दूध डेअरीला दूध विकते आणि माझ्या दोन मुलींच्या आणि एका मुलाच्या शाळेचे शुल्क व इतर खर्च यातूनच भागवते.
- मनीषा गोटीराम रिकामे, शेतकरी महिला
----------------
आमची काही जमीन पडीक होती; तर उर्वरित क्षेत्रातून पुरेशे उत्पन्न मिळत नव्हते. दीपक फर्टिलायझर्सच्या ‘वाडी’ प्रकल्पाद्वारे मी आंब्याची झाडे (केसर वाण) लावली. आंबा लागवडीच्या सुधारित पद्धती शिकल्या, तसेच आंबा लागवडीबरोबर मला भाजीपाला लागवड करणेही शिकवले. पूर्वी मी फक्त १० ते १५ गुंठे क्षेत्रावर भाजीपाला लागवड करत होते. आता मी ४० ते ५० गुंठे क्षेत्रावर लागवड करत आहे.
- कालीबाई श्रावण भगत, शेतकरी महिला