मोठी बातमी : प्रियांका गांधींचे पती रॉबर्ट वाड्रा यांना अटक होणार? घरापासून चालत गेले ईडी कार्यालयात...
Sarkarnama April 16, 2025 09:45 AM

काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांचे पती व उद्योजक रॉबर्ट वाड्रा यांना ईडीने मंगळवारी दुसरे समन्स बजावले. त्यानंतर रॉबर्ट वाड्रा हे आपल्या घरातून ईडी कार्यालयापर्यंत चालत गेले. त्यामुळे त्यांच्या या कृतीवरून आता तर्कवितर्क लढवले जाऊ लागले आहेत. वाड्रा यांना अटक होणार का, याबाबतही चर्चांना उधाण आले आहे.

रॉबर्ट वाड्रा हे गांधी कुटुंबाचे जावई असल्याने त्यांच्या ईडी चौकशीला महत्व प्राप्त झाले आहे. मंगळवारी सकाळी 11 वाजता ईडीने त्यांना हरियाणातील शिखोपूर जमीन व्यवहाराशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात दुसरे समन्स पाठवले आहे. त्याआधी त्यांना 8 एप्रिल रोजी समन्स पाठवले होते. पण त्यावेळी वाड्रा यांनी चौकशीला सामोरे जाणे टाळले होते.

मंगळवारी ईडीच्या कार्यालयाकडे जात असताना वाड्रा यांनी मीडियाशीही संवाद साधला. यावेळ त्यांनी आपल्याला काही लपवण्याची गरज नसल्याचे सांगितले. मी जेव्हा-जेव्हा लोकांसाठी आवाज उठवेन, तेव्हा हे लोक मला दाबण्याचा प्रयत्न करतील. पण मी घाबरणाऱ्यांपैकी नाही, असा वाड्रा यांनी स्पष्ट केले.

ईडी कार्यालयात घरापासून चालत जाण्याचे कारण विचारल्यानंतर वाड्रा यांनी सांगितले की, लोकांना वाटत असेल की राजकारणा यावे, तर लोक माझ्यासोबत येतील. लोकांना वाटत होते की, पायी जावे. पण त्यांना रोखण्यात आले. या केसमध्ये काहीच नाही. तपासासाठी 20 वर्षे लागत नाहीत, असे वाड्रा म्हणाले. त्यांच्या या विधानामुळे त्यांची राजकारणा एन्ट्री होणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे.

का पाठवले समन्स?

ईडीने समन्स पाठवलेले प्रकरण 2008 मधील आहे. त्यावेळी भूपेंद्र सिंह हुडा हे हरियाणाचे मुख्यमंत्री होते. सरकारने त्यावेळी वाड्रा यांच्या कंपनीला 2.70 एकर जमीन व्यावसायिक कॉलनीसाठी विकसित करण्याच्या उद्देशाने दिली होती. पण त्याऐवजी कंपनीने ही जमीन 2012 मध्ये 58 कोटी रुपयांना डीएलएफ यूनिव्हर्सल लिमिटेड कंपनीला विकली.

हरियाणा सरकारने कमी किंमतीत दिलेली जमीन वाड्रा यांच्या कंपनीने अधिकच्या किंमतीत विकून कोट्यवधी रुपयांची कमाई केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. वाड्रा यांची कंपनी स्कायलाई हॉस्पिटॅलिटी प्रायव्हेट लिमिटेडने 18 सप्टेंबर 2012 मध्ये हा व्यवहार केला होता. पण त्यावेळी हरियाणा सरकारच्या नगर नियोजन विभागाने परवाना हस्तांतरित करण्याची अंतिम मान्यता दिलेली नव्हती, असाही आरोप होत आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.