सलग चार सामन्यांमध्ये विजय मिळवल्यानंतर दिल्ली कॅपिटल्स संघाला घरच्या मैदानावर मुंबई इंडियन्सकडून हार पत्करावी लागली. आता हा पराभव मागे टाकून अक्षर पटेलचा दिल्लीचा संघ आज पुन्हा एकदा घरच्या मैदानावर होत असलेल्या आयपीएल साखळी फेरीच्या लढतीत राजस्थान रॉयल्सला नमवण्याचा प्रयत्न करेल.
एकीकडे दिल्लीचा संघ घरच्या मैदानावर पहिला विजय मिळवण्यासाठी सज्ज असेल, तर दुसरीकडे संघ सलग तिसरा पराभव टाळण्यासाठी प्रयत्न करेल.
भारतातील स्थानिक मोसमात धावांचा पाऊस पाडणाऱ्या करुण नायर याने खेळताना मुंबईविरुद्धच्या लढतीत ८९ धावांची धडाकेबाज खेळी साकारली, मात्र २०६ धावांचा पाठलाग करणाऱ्या दिल्लीला १९३ धावांपर्यंतच मजल मारता आली. अखेरच्या षटकांमध्ये दिल्लीच्या फलंदाजांकडून चुका झाल्या. त्यामुळे आयपीएलच्या यंदाच्या मोसमातील पहिल्याच पराभवाला त्यांना सामोरे जावे लागले.
अभिषेक पोरेल, के. एल. राहुल, ट्रिस्टन स्टब्स व आशुतोष शर्मा यांच्या बॅटमधून धावा निघत आहेत, पण जेक मॅकगर्क, अक्षर पटेल यांना फलंदाजीत सातत्यपूर्ण कामगिरी करावी लागणार आहे.
स्टार्क, कुलदीपवर मदारदिल्ली संघाची गोलंदाजी मदार मिचेल स्टार्क व कुलदीप यादव या दोन गोलंदाजांवर आहे. दोघांनी आतापर्यंत प्रभावी कामगिरी केलेली आहे. मुकेशकुमार व मोहित शर्मा या वेगवान गोलंदाजांच्या कामगिरीत सातत्य दिसून आलेले नाही.
विपराज निगम कुलदीप यादवला तोलामोलाची साथ देत आहे. अक्षर पटेलच्या नेतृत्वात दिल्लीचा संघ छान कामगिरी करीत आहे, पण तो स्वत: अष्टपैलू कामगिरी करण्यात कमी पडत आहे.
स्टार खेळाडूंकडून आशाराजस्थानच्या संघात एकापेक्षा एक असे स्टार खेळाडू आहेत. यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन, रियान पराग, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, नितीश राणा या फलंदाजांमुळे राजस्थानचा हा विभाग भक्कम होत आहे, पण तरीही हा संघ सांघिक कामगिरीत मागे पडत आहे.
या संघातील प्रत्येक फलंदाज अधूनमधून छान खेळ करीत आहे अन् याच कारणामुळे राजस्थानला सहापैकी दोन सामन्यांमध्येच विजय मिळवता आलेला आहे. त्यामुळे राजस्थानच्या फलंदाजांना दबावाखाली खेळ उंचावण्याची गरज आहे.
परदेशी गोलंदाजराजस्थानच्या संघात परदेशी गोलंदाज आहेत. जोफ्रा आर्चर, माहीश तीक्षणा, वनिंदू हसरंगा या तीनही परदेशी गोलंदाजांकडून राजस्थानला मोठ्या अपेक्षा आहेत. त्या परिपूर्ण व्हायला हव्यात.
तुषार देशपांडे, संदीप शर्मा व कुमार कार्तिकेय या भारतीय गोलंदाजांनाही दिल्लीच्या फलंदाजांना रोखावे लागणार आहे. आणखी एका पराभवानंतर राजस्थानचा पाय खोलात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
आजची लढतदिल्ली कॅपिटल्स - राजस्थान रॉयल्स
नवी दिल्ली, संध्याकाळी ७.३० वाजता