बेळगाव : कुद्रेमानी (ता. बेळगाव) गावात पिसाळलेल्या कुत्र्याने (Dog Attack) अचानक केलेल्या हल्ल्यात आठ ग्रामस्थ जखमी झाले. सोमवारी (ता. १४) रात्री ८ ते ११ या दरम्यान ही घटना घडली. जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे भटक्या कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यामुळे ग्रामस्थांतही भीतीचे वातावरण आहे.
कुद्रेमानीत घडलेल्या या घटनेत एका महिलेसह सात पुरुष जखमी झाले. सोमवारी रात्री ८ च्या दरम्यान कुद्रेमानी गावातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळून विठ्ठल मंदिरकडे गेलेल्या रोडवरून ये-जा करणाऱ्यांचा चावा या पिसाळलेल्या घेतला. तसेच येथील विठ्ठल मंदिरात दोघेजण बसले होते. त्यातील एका व्यक्तीचा चावादेखील या कुत्र्याने घेतला.
त्यानंतर मारुती गल्ली, टिळकवाडी गल्ली या ठिकाणीही काहींचा चावा घेतल्यानंतर त्या पिसाळलेल्या कुत्र्याला पकडण्यात यश आले. त्यानंतर त्याला गावाबाहेर काढण्यात आले. कुत्र्याच्या या हल्ल्यात मल्लप्पा पाटील, मल्लप्रभा पाटील, नीलकंठ साकरे, विठ्ठल मांडेकर, भरमू कालकुंद्रीकर यांच्यासह अन्य ग्रामस्थ जखमी झाले आहेत. एका व्यक्तीच्या हाताच्या बोटापासून ते कोपऱ्यापर्यंत कुत्र्याने चावा घेतला असून, या हल्ल्यात गंभीर जखमी झाले आहेत.
ही घटना घडल्यानंतर कुद्रेमानी ग्रामस्थांनी एकत्रित येऊन या कुत्र्याची शोधमोहीम सुरू केली. अखेर रात्री ११ वाजता त्या कुत्र्याला पकडण्यात यश आले. सर्व जखमींना तत्काळ बीम्स रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी त्या पिसाळलेल्या कुत्र्याला गावाबाहेर काढले आहे. ही घटना बेळगाव ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली असून, पुढील तपास सुरू आहे.
बेळगाव शहरातील इंद्रप्रस्थनगर येथील दोन सुरक्षारक्षकांना पिसाळलेल्या कुत्र्याने जखमी केले. ही घटना ताजी असतानाच पुन्हा कुद्रेमानीत घटना घडली आहे. शहरात यापूर्वीदेखील अशा घटना वारंवार घडल्या आहेत. तरीदेखील या समस्येकडे प्रशासनाने दुर्लक्षच केलेले आहे. वारंवार अशा घटना होऊ नये, याची खबरदारी प्रशासनाने घ्यावी, अशी मागणी होत आहे.