कोल्हापूर : ‘तत्कालीन परिस्थितीत परदेशात जायला कोणी तयार नसताना राजाराम महाराज (दुसरे) ‘स्पिरीट ऑफ इन्क्वायरी’च्या बळावर (England) गेले. ब्रिटिश कसे राज्य करतात, याची उत्सुकतेने माहिती घेतली. मात्र, परत येताना राजाराम महाराजांचे (Rajaram Maharaj) निधन झाले. त्यांचे निधन झाले नसते, तर कोल्हापूरचा इतिहास बदलला असता,’ असे प्रतिपादन खासदार शाहू महाराज (Shahu Maharaj) यांनी केले.
शिवाजी विद्यापीठ व रा. अ. (बाळ) पाटणकर परिवारातर्फे छत्रपती राजाराम महाराज (दुसरे) यांच्या शतकोत्तर अमृत महोत्सवी जयंतीनिमित्त प्राचार्य डॉ. इस्माईल पठाण लिखित ‘छत्रपती राजाराम महाराज (करवीर दुसरे)’ आणि ‘यात्रा युरोपची : छत्रपती राजाराम महाराज द्वितीय यांची रोजनिशी (१८७०)’ या प्रा. डॉ. रघुनाथ कडाकणे अनुवादित दोन ग्रंथांचे प्रकाशन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. नाबार्डचे माजी अध्यक्ष यशवंत थोरात प्रमुख उपस्थित होते.
डॉ. थोरात म्हणाले, ‘वास्तव आणि कल्पनाशक्ती यातील मोकळ्या जागेत इतिहासकार तर्काच्या आधारे सर्जनशील विश्लेषण करतो. डॉ. पठाण यांनी राजाराम महाराज (दुसरे) यांच्याविषयी सूक्ष्म, चिकित्सक दृष्टीचे लेखन केले. राजाराम महाराजांच्या रोजनिशीचा डॉ. कडाकणे यांनी अनुवाद केला, तो भविष्यात इतिहास संशोधनासाठी उपयुक्त ठरेल. राजाराम महाराज युरोपला गेल्याचा काळ, युरोप व इंग्लंडमधील स्थिती, अन्य राष्ट्रातील तत्कालीन युद्ध स्थिती, कष्टकऱ्यांचे शोषण, असे अनेक पदर समजून घेणे यामुळे शक्य होईल.’
डॉ. जयसिंगराव पवार म्हणाले , ‘१८५७ ला तत्कालीन अन्य राजांचे विचार मध्ययुगीन काळापुरते मर्यादित होते. मात्र, राजाराम महाराजांची दृष्टी नवीन युगाचे अग्रदूत व आधुनिक युगातील शुक्रताऱ्याप्रमाणे होती. चौकसबुद्धीचे ते महाराष्ट्रातील राजे होते. म्हणून ते परदेशात गेले. तेथील कारभार पाहिला. त्यातील कोल्हापूरला काय करता येईल, याचा सूक्ष्म विचार केला. आणखी आयुष्य लाभले असते, तर कोल्हापुरात आधुनिक बदल त्यांनी घडविले असते.’
डॉ. पठाण म्हणाले, ‘पाटणकर घराण्यात जन्मलेले राजाराम महाराज (दुसरे) वयाच्या १६ वर्षी येथील संस्थानात दत्तक आले. ते प्रखर बुद्धिमत्तेचे होते. अवघ्या दीड वर्षात अस्सलखित इंग्रजी बोलू लागले. त्यांनी युरोपच्या दौऱ्यात कुठेही मौज केली नाही. त्यांनी तेथील राजकारभार अनुभवला, विद्यापीठात गेले, विविध व्याख्याने ऐकली, नव्या गोष्टी शिकण्यावर भर दिला. मात्र, ते परत येताना आजारपणात त्यांचे निधन झाले. तेव्हा इटली मंत्रिमंडळाने बैठक घेऊन अंत्यसंस्काराला मान्यता दिली. त्यांचे स्मारक इटलीमध्ये उभारले, असे अनेक संदर्भ या ग्रंथात आहेत.’
कुलगुरू डॉ. शिर्के, माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी राजकीय विश्लेषक, ज्येष्ठ पत्रकार डॉ. श्रीराम पवार, प्राचार्य सुनीलकुमार लवटे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. बाळ पाटणकर यांनी स्वागत केले. पंडित कंदले यांनी सूत्रसंचलन केले.
‘राजाराम महाराज (दुसरे) यांनी युरोप दौऱ्यात रोजनिशीत अत्यंत पारदर्शक, खऱ्या घटना व संदर्भासह इंग्रजीत लिहिल्या. एक राजा विविध संदर्भासह रोजनिशी लिहितो, तत्कालीन सामाजिक परिस्थितीसोबत राजकारभाराचे अनेक पदर त्यात दाखवतो. त्या रोजनिशीचे अनुवादवाचन दिशादर्शक ठरेल,’ असे डॉ. कडाकणे यांनी सांगितले.