सोलापूर : लातूर येथील पुरणमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतनमध्ये २०२५-२६ पासून शासकीय अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रम शिकविण्यास मंगळवारी (ता. १५) मंत्रिमंडळाने (उच्च व तंत्रशिक्षण विभाग) मान्यता दिली. पण, सोलापूरच्या शासकीय अभियांत्रिकीसंदर्भात कोणताही निर्णय झाला नाही. त्रिसदस्यीय समितीने अहवाल शासनाला सादर करूनही सोलापूरकरांना मंत्रिमंडळाच्या मान्यतेची प्रतीक्षाच करावी लागत आहे.
सोलापूरमध्ये शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करण्याची मागणी सुमारे २० वर्षांपूर्वीची आहे. तरीदेखील, रत्नागिरी, कोल्हापूर आणि आता लातूर येथे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयास सरकारकडून मान्यता मिळाली. पण, सोलापूरकरांच्या नशिबी अजूनही प्रतीक्षाच आहे. लातूर येथे इमारत वापराविना पडूनच होती, जागाही शासनाची होती. त्यामुळे तेथील शासकीय अभियांत्रिकीसाठी खर्च मोठा होणार नसल्याने मान्यता मिळाली असावी, असा अंदाज बांधला जात आहे.
पण, सोलापुरातील शासकीय तंत्रनिकेतनची देखील खूप मोठी जागा उपलब्ध असून केवळ नवीन इमारत बांधकाम, प्रयोगशाळा (लॅब) आणि ग्रंथालय अशाच सुविधा त्याठिकाणी कराव्या लागणार आहेत. त्यासाठी देखील शासनाकडून निधी तर सोडा, मान्यता देखील मिळत नसल्याची वस्तुस्थिती आहे. दरवर्षी सोलापुरातील शेकडो विद्यार्थी अभियांत्रिकी शिक्षणासाठी परजिल्ह्यात जातात. आयटी पार्क किंवा मोठे उद्योग सोलापुरात नसल्याने हजारो तरुण दरवर्षी सोलापूर सोडतात, अशी वस्तुस्थिती आहे.
शासकीय अभियांत्रिकीसाठी पूरक बाबी...
१) सोलापूरमधील शासकीय तंत्रनिकेतनच्या परिसरात मोठी जागा उपलब्ध असल्याने शासकीय अभियांत्रिकी अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी जागेचा खर्च होणार नाही
२) जिल्ह्यात दरवर्षी पाच हजार विद्यार्थी घेतात अभियांत्रिकीला प्रवेश; मोफत अभियांत्रिकीसाठी विद्यार्थी संख्याही पुरेशी
३) शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करण्यासाठी लागतात ३०० कोटी रुपये. पण ते चार वर्षांत टप्प्याटप्प्याने लागणार असल्याने खर्च नाही खूप मोठा
मंत्र्यांची ग्वाही अन् आमदारांचा पाठपुरावा
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (अभाविप) पदाधिकाऱ्यांनी दोन महिन्यांपूर्वी सोलापूर दौऱ्यावर आलेले उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना सोलापुरात शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करण्यासंदर्भातील मागणी केली होती. आमदार देवेंद्र कोठे यांनीही पाठपुरावा केला होता. अधिवेशनादरम्यान देखील त्यांनी तशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली होती. मात्र, मंगळवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत लातूरला शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करण्यास मान्यता मिळाली, पण सोलापूरच्या संदर्भातील समितीचा अहवालावर कोणताही निर्णय झाला नाही, हे विशेष.