वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी माजी आयएएस प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकरला अटकेपासून संरक्षण देण्याच्या स्वत:च्या आदेशाचा कालावधी वाढविला आहे. पूजावर 2022 च्या युपीएससी परीक्षेकरता पात्र ठरण्यासाठी स्वत:च्या दस्तऐवजांमध्ये फेरफार केल्याचा आरोप आहे. न्यायाधीश बी.व्ही. नागरत्न आणि सतीशचंद्र शर्मा यांच्या खंडपीठाने याप्रकरणी पुढील सुनावणी 21 एप्रिल रोजी निश्चित केली आहे. तोपर्यंत पूजा खेडकरला अटकेपासून दिलेले अंतरिम संरक्षण जारी राहणार असल्याचे खंडपीठाने म्हटले आहे.
खंडपीठाने दिल्ली पोलिसांना याप्रकरणी तपास लवकर पूर्ण करण्यास सांगितले आहे. तसेच खेडकरने प्रतिज्ञापत्र सादर करत तपासात सहकार्य करण्यास तयार असल्याचे म्हटले असले तरीही पोलीस तपास पूर्ण का करू शकले नाहीत अशी विचारणा खंडपीठाने केली.
युपीएससी उमेदवारांकडून सादर करण्यात आलेल्या बनावट दस्तऐवजांच्या मोठ्या घोटाळ्याच्या चौकशीसाठी पोलिसांना आरोपीला ताब्यात घेत चौकशी करावी लागणार असल्याचा युक्तिवाद अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एस.व्ही. राजू यांनी केला होता. यावर ज्या स्रोताकडून खेडकरने कथित बनावट प्रमाणपत्र प्राप्त केले, त्याचा खुलासा केला जावा, परंतु याकरता पूजा खेडकरला कोठडीत ठेवणे आवश्यक नसल्याचे खंडपीठाने म्हटले.