सचिन जाधव, साम टीव्ही
पुणे : पुण्यात गुन्हेगारीचं प्रमाण सतत वाढत चाललं आहे. हत्या, दरोडा, बलात्कार अशा प्रकारच्या घटनांचं सत्र सुरुच आहे. याचदरम्यान, पुण्यातील बिबडेवाडीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बिबडेवाडीतील एका शेतकऱ्याची काही पैशांसाठी हत्या करण्यात आली आहे. खडकवासला परिसरातील सांगरुण गावात ही घटना उघडकीस आली आहे.
पैशांसाठी बिबवेवाडीतील शेतकऱ्याचा धारधार शस्त्राने वार करून हत्या केल्याची घटना खडकवासला परिसरात घडली. या प्रकरणी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नारायण ऊर्फ नाना पांडुरंग मानकर (वय ७३, रा. लोकेश सोसायटी, बिबवेवाडी) असं हत्या झालेल्या शेतकऱ्याचं नाव आहे. याबाबत मुलाने दिलेल्या फिर्यादीवरून सतीश विठ्ठल खडके (वय ३५, रा. सांगरूण, ता. हवेली) आणि त्याच्या एका महिला सहकारी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी या दोन्ही आरोपींना अटक केली असून त्यांना सात दिवसाची पोलीस कोठडी मिळाली आहे.
सतीश खडके याने नाना मानकर यांना शेतीच्या कामाच्या बहाण्याने आपल्या वाहनातून सांगरूण येथे नेलं. खडके आणि त्याच्या साथीदारांचा जमिनीवरून मानकर यांच्याशी वाद झाला. या वादातून आरोपींनी नाना मानकर यांच्यावर केले. त्यात गंभीर जखमी झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. रात्री उशिरापर्यंत वडील घरी न परतल्यानं नीरज मानकर यांनी त्यांचा शोध घेतला. दुसऱ्या दिवशी शनिवारी दुपारी नथू मानकर यांच्या मालकीच्या जागेत लावलेल्या वाहनात नाना मानकर यांचा मृतदेह आढळून आला. त्यांच्या गळ्यातील दोन सोन्याचे गोफ आणि हातातील दोन अंगठ्या असं १९ तोळे सोन्याचे दागिने देखील चोरीस गेले आहेत.