लाखांपासून फक्त दोनच हजार कमी… सोन्याच्या दराने 98 हजारांचा पल्ला गाठला
Marathi April 17, 2025 01:26 AM

मुंबई : सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याच्या सोन्याने प्रतितोळा 98 हजारांवर (Gold Rates Today) झेप घेतली आहे. हा आतापर्यंतचा सर्वात मोठा उच्चांक आहे. एक लाखापासून सोनं अवघं दोन हजार रूपये दूर आहे. अमेरिकेत ट्रम्प यांनी घेतलेल्या आक्रमक निर्णयांमुळे जागतिक मंदीचा धोका वाढल्याचं चित्र आहे. सोन्याच्या दरात बुधवारी 1650 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे सोन्याचे दर लवकरच एक लाखांच्या वरती जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अलीकडे जागतिक स्तरावर घडलेल्या काही आर्थिक अस्थिरतेमुळे सोन्याकडे सुरक्षित गुंतवणुकीच्या पर्यायाकडे पाहिलं जात आहे. त्यामुळे त्याच्या किमतीत वाढ होत असल्याचं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे.

अमेरिका-चीन टॅरिफ वॉरचा फटका

अमेरिका आणि चीनमध्ये सुरू असलेल्या टॅरिफ वॉरचा फटका हा जगाला बसत असून त्यामुळेच सोन्याच्या किमतीमध्ये सातत्याने वाढ होत आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किमतीमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासह अनेक देशांवर मोठा आयात शुल्क लावण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी सोन्याच्या किमतीमध्ये काहीशी घट होऊन ती 87 हजारांच्या जवळपास गेली होती. पण नंतर चीन वगळता इतर सर्वच देशांवरील आयातकर हा 10 टक्क्यांवर करण्याचा निर्णय ट्रम्प यांनी केला. पण हा कालावधी फक्त 90 दिवसांपुरता आहे. त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प काय निर्णय घेतील याचा अंदाज लावता येत नाही.

चीनवर आता 245 टक्के आयात शुल्क लागू

या उलट चीनवर सुरुवातीला 125 टक्क्यांपर्यंत आयात शुल्क लावण्याचा अमेरिकेने निर्णय घेतला होता. त्याला चीनने तसेच प्रत्युत्तर दिल्यानंतर अमेरिकेने चीनवरील आयात शुल्क वाढवून ते 245 टक्के केलं. या टॅरिफ वॉरमुळे मंदीची शक्यता वर्तवली जात आहे. परिणामी भांडवली बाजारातील गुंतवणुकीपेक्षा सोन्याकडे सुरक्षित गुंतवणूक म्हणून पाहिलं जात आहे. त्यामुळेच सोन्याच्या किमतीमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. आता सोन्याचे दर हे लाखांपासून फक्त दोन हजारांनी दूर आहेत.

येत्या 30 एप्रिल रोजी अक्षय तृतिया असून त्या दिवशी सोन्याचे भाव हे एक लाखाहून अधिक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच त्यानंतर लग्नसराई आणि दिवाळीचा सण असल्यानेही सोन्याच्या दरात अस्थिरता राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ही बातमी वाचा:

अधिक पाहा..

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.