डिजिटल शिक्षणासाठी 'महाज्ञानदीप' पोर्टल कार्यान्वित
esakal April 17, 2025 01:45 AM

पुणे, ता. १६ : डिजिटल शिक्षणाच्या दिशेने महाराष्ट्राची वाटचाल सुरू झाली असून ‘महाज्ञानदीप’ या ऑनलाइन पोर्टलच्या माध्यमातून शैक्षणिक सुविधांचे लोकाभिमुखीकरण करण्यात आले आहे. राज्यात देशातील पहिले डिजिटल शिक्षण पोर्टल सुरू झाले आहे. या पोर्टलची सुरुवात मुंबईत उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाली.
याप्रसंगी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव वेणुगोपाल रेड्डी, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेश देवळाणकर, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे उपस्थित होते. ‘महाज्ञानदीप’ उपक्रमांतर्गत एक हजार तज्ज्ञ प्राध्यापक घडवण्याचा संकल्प आहे. आतापर्यंत १५० प्राध्यापकांना प्रशिक्षण देण्यात आले असून, त्यांनी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अंतर्गत ‘भारतीय ज्ञान प्रणाली- जेनेरिक’ हा अभ्यासक्रम मराठी भाषेत तयार केला आहे. हा अभ्यासक्रम पोर्टलवर अपलोड केला असून जगभरातील विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहे.
पोर्टलच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही गुणवत्तापूर्ण शिक्षण ऑनलाइनद्वारे सहज एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. उपक्रमामध्ये यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर आणि एसएनडीटी महिला विद्यापीठ मुंबई यांचा समावेश आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.