नागपूर : बनावट शालार्थ आयडी प्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश, काय आहे प्रकरण?
BBC Marathi April 17, 2025 02:45 AM
Getty Images प्रातिनिधिक छायाचित्र

नागपूर जिल्ह्यात 2019 पासून 580 शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना पात्र नसताना बनावट शालार्थ आयडी तयार करून वेतन देण्यात आले. यामाध्यमातून शासनाच्या तिजोरीतून कोट्यवधी रुपयांची लूट करण्यात आली.

या प्रकरणात सहभागी असणाऱ्या सर्व संबंधितांविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे निर्देशन शिक्षण विभागाकडून शिक्षण आयुक्तांना देण्यात आले आहेत.

शिक्षण विभागानं दिलेल्या माहितीनुसार, बनावट शालार्थ आयडी तयार करून शासनाची कोट्यवधींची रुपयांची फसवणूक झाल्याचे शिक्षण विभागानं केलेल्या चौकशीत समोर आलं आहे.

पुण्यातील प्राथमिक शिक्षण संचालकांनी 23 ऑगस्ट 2024 च्या आदेशानुसार नागपूर विभागीय अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली चौकशी समिती नेमली होती.

त्यानसार नागपूर जिल्ह्यात 2019 पासून 580 प्राथमिक शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना बनावट शालार्थ आयडी तयार केल्याचं समोर आलं होतं. ती यादी सुद्धा शिक्षण विभागाकडे आहे. या यादीची प्राथमिक तपासणी केली असता शालार्थ आयडी प्राणालीचा पासवर्ड हॅक करून किंवा त्याचा गैरवापर करून ड्राफ्ट जनरेट केल्याचं समोर आलं.

कसे बनवले शालार्थ आयडी?

संबंधित शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा नावाचा ड्राफ्ट शालार्थ प्रणालीमध्ये टाकून हाच ड्राफ्ट शाळेला पाठवण्यात आला.

जिल्हा परिषद नागपूरमधील प्राथमिकचे वेतन व भविष्य निर्वाहचे अधीक्षक निलेश वाघमारे यांनी हा ड्राफ्ट मंजूर करून वेतन देयक व थकीत देयक काढल्याचं प्राथमिक चौकशीत समोर आलं होतं.

एकूण 580 शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी पात्र नसताना सुद्धा त्यांचा बनावट शालार्थ आयडी तयार करून त्यांना वेतन देण्यात आले. या चौकशीचा अहवाल शिक्षण आयुक्त कार्यालयाला पाठवण्यात आला.

शासकीय निधीच्या अपहारामध्ये निलेश वाघमारेचा सहभाग आढळून आल्यानं त्यांच्याविरोधात निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

Getty Images प्रातिनिधिक छायाचित्र जबाबदार अधिकारी, कर्मचाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्याचे आदेश

दुसऱ्या प्रकरणात नागपूरचे शिक्षण उपसंचालक उल्हास नरड यांना अटक झाली आहे. पण नरड यांचा बनावट शालार्थ आयडी प्रकरणात काही सहभाग आहे का हे तपासण्यात येणार आहे, असं पुढे शिक्षण विभागातील सुत्रांनी सांगितले.

उल्लेखनीय बाब म्हणजे एक महिन्यांपूर्वी बनावट शालार्थ आयडी तयार करुन अपहार झाला होता का, यासंबंधीचा अहवाल उल्हास नरड यांनीच शिक्षण आयुक्त कार्यालयाला पाठवला होता. पण आता त्यांनाच दुसऱ्या प्रकरणात अटक झाल्यानंतर त्यांनी पाठवलेल्या अहवालाबाबतही चर्चा होत आहे.

शिक्षण विभागातील सुत्रांनी सांगितले की, कोणीतरी शालार्थ आयडीचा गैरवापर करून पात्र नसलेल्या लोकांना वेतन दिले. मागच्या तारखेमध्ये नियुक्ती करून वेतन काढून शासनाच्या पैशांची लूट केली असं त्यांनी अहवालात म्हटलं होतं. पण, शालार्थ आयडी प्रणालीचा पासवर्ड गोपनीय असतो आणि त्याची माहिती फक्त शिक्षण उपसंचालकांना असते.

तसेच, शालार्थ आयडी तयार करण्याचे अधिकार शिक्षण उपसंचालकांना असतात. त्यामुळे शालार्थ आयडी प्रणाली हॅक करून त्याचा गैरवापर झाला का? तो गैरवापर उल्हास नरड यांच्या कार्यालयातीलच एखाद्या कर्मचाऱ्यानं केलाय का? याचा तपास सायबर पोलीस करत आहेत. त्यांचा 15 दिवसांत तपास पूर्ण होईल तो अहवाल शिक्षण आयुक्त कार्यालयाला जाईल.

त्यामुळे उल्हास नरड यांची 580 शिक्षकांच्या बनावट शालार्थ आयडी प्रकरणात काही भूमिका आहे का? हे सध्यातरी सांगणं अवघड आहे. बनावट शालार्थ आयडी प्रकरणामागे कोण आहे? हे सायबर गुन्हे विभागाचा तपास झाल्यानंतरच समजू शकणार आहे, अशीही माहिती सूत्रांनी दिली.

UGC उल्हास नरड

तसेच नागपूर शिक्षक भरती घोटाळा प्रकरणात उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रतापसिंह यांनी दिले आहेत. शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांच्या नेतृत्वात चौकशी समिती तयार केली असून या प्रकरणात किती कोटींचा घोटाळा झाला, शालार्थ आयडीवर मागच्या तारखांच्या नियुक्त्या दाखवून किती एरियर्स काढले या सगळ्यांचा तपास करत आहे.

दरम्यान या प्रकरणात नागपूर शिक्षण विभागातील जे अधिकारी, कर्मचारी जबाबदारी असतील त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्याचे आदेशही शिक्षण विभागाने दिलेले आहेत.

उल्हास नरड यांना अटक झाले ते प्रकरण काय आहे?

नागपूरचे शिक्षण उपसंचालक उल्हास नरड यांनी शुक्रवारी 11 मार्चला रात्री उशिरा गडचिरोलीतून अटक करण्यात आली. त्यांना ज्या प्रकरणात अटक झाली ते प्रकरण आणि 580 शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे बनावट शालार्थ आयडीचे प्रकरण दोन्हीही वेगवेगळे आहेत.

नरड यांच्यावर बनावट कागदपत्रांच्या आधारे मुख्याध्यापकाची ओरिजनल शालार्थ आयडी तयार केल्याचा आरोप आहे.

नरड यांनी तयार करुन दिलेल्या कागदपत्रांच्या आधारे एका व्यक्तीला मुख्याध्यापकाची नोकरी लागली. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती.

नागपूर शहरातील सदर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मनिष ठाकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुन्ना तुलाराम वाघमारे हे लाखनीतल्या शाळेत पेंटर म्हणून काम करतात. बनावट कागदपत्रांच्या आधारे पराग नानाजी पुडके हा मुख्याध्यापक बनल्याची कुजबूज या पेंटरला लागली होती.

त्यामुळे त्याने या प्रकरणात 2 एप्रिलला तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी पराग नानाजी पुडके या मुख्याध्यापकाला अटक केली आहे. पराग पुडके याला शिक्षक म्हणून कुठलाही अनुभव नव्हता. पण, संस्थाचालकाने आपलाच मुलगा परागला मुख्याध्यापक पदावर नेमले होते, असे पोलिसांनी सांगितले.

शिक्षण उपसंचालकांनी मुख्याध्यापकाचं आठ महिन्यांचं वेतन लुटलं?

बनावट कागदपत्रांच्या आधारे ओरिजनल शालार्थ आयडी तयार करून मुख्याध्यापक पराग पुडकेला शासनाकडून वेतन सुरू झालं होतं. पण, त्याने ज्या शाळेचे कागदपत्रं शालार्थ आयडी तयार करण्यासाठी वापरले होते ते बनावट होते.

पुडकेनी एका शाळेत काम केल्याचा अनुभव दाखवला होता. परंतु त्या शाळेत त्यांनी काम केलेच नव्हते. तरी देखील त्यांनी बनावट कागदपत्र तयार करुन खोटे अनुभवाचे प्रमाणपत्र काढले. नंतर याच आधारावर ओरिजनल शालार्थ आयडी मिळवून वेतन सुरू केले.

अनुभव प्रमाणपत्र खोटे असल्याचे नरड यांच्या लक्षात आणून दिल्यावर त्यांनी त्याकडे कानाडोळा केल्याचे आढळले आणि पुडके यांना हवा असलेला शालार्थ आयडी त्यांनी त्यांच्या नावे केला. अशी माहिती सदर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मनिष ठाकरे यांनी दिली.

कागदपत्रं बनावट आहे हे माहिती झाल्यानंतरही शिक्षण उपसंचालकांनी मुख्याध्यापकपदाची शालार्थ आयडी कशी तयार केली? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

आधी शालार्थ आयडी तयार करण्यासाठी आर्थिक व्यवहार झाला. तसेच मुख्याध्यापक पदाची आयडी तयार झाल्यानंतर पराग पुडकेला शासनाकडून मासिक एक लाख रुपये वेतन सुरू झाले होते. त्यांना मिळालेले प्रत्येक महिन्याचे एक लाख असे आठ महिन्याचे आठ लाख रुपये वेतन उल्हास नरड यांनी लुटले होते, अशी माहिती पोलीस विभागातील सूत्रांनी दिली.

या प्रकरणात शिक्षण उपसंचालक उल्हास नरड, मुख्याध्यापक पराग पुडके, शिक्षणाधिकारी कार्यालयातील अधीक्षक वर्ग दोनचे अधिकारी निलेश मेश्राम, शिक्षण उपसंचालक कार्यालयातील शिक्षण उपनिरीक्षक संजय दुधाळकर आणि याच कार्यालयातील वरिष्ठ लिपिक सूरज नाईक अशा एकूण पाच जणांना अटक करण्यात आलेली आहे.

या प्रकरणात बनावट कागदपत्रं कोणी तयार केली, यावर बनावट सह्या कोणी केल्या याचा तपास देखील पोलिस करत असल्याची माहिती नागपूरचे पोलिस उपायुक्त राहुल मदने यांनी दिली. तसेच कोर्टानं या पाचही आरोपींची पोलिस कोठडीत रवानगी केलेली आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.