यंदाच्या आयपीएल हंगामातील 32वा सामना दिल्ली कॅपिटल्स विरूद्ध राजस्थान राॅयल्स संघात खेळला गेला. दरम्यान दोन्ही संघ दिल्लीच्या अरूण जेटली स्टेडियमवर आमने-सामने होते. दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना राजस्थानसमोर 189 धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात राजस्थान संघाने 188 धावा केल्या. त्यानंतर दोन्ही संघात सुपर ओव्हरचा रोमांचक थरार पाहायला मिळाला. सुपर ओव्हरमध्ये दिल्लीने बाजी मारली आणि शानदार विजय मिळवला.
राजस्थानने टॉस जिंकून दिल्लीला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं होतं. दरम्यान दिल्लीने मर्यादित 20 षटकांमध्ये 5 गडी गमावून 188 धावा केल्या. दिल्लीसाठी सलामीला आलेल्या जेक फ्रेझर मॅकगर्क आणि अभिषेक पोरेल यांनी संघाला हवी तशी सुरुवात करून दिली नाही. दिल्लीने 34 या धावसंख्येवर दोन विकेट्स गमावल्या. सलामीवीर मॅकगर्कला राजस्थानचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरने 9 धावांवर पवेलियनचा रस्ता दाखवला. त्याच्यानंतर करून नायर फलंदाजीसाठी मैदानात उतरला परंतु, तो 3 चेंडू खेळून 0 धावसंख्येवर धावबाद होऊन तंबूत परतला.
दिल्लीसाठी अभिषेक पोरेलने 49 धावांची खेळी केली. तो फिरकीपटू वानिंदू हसरंगाच्या चेंडूवर झेलबाद झाला. त्याने आपल्या खेळीत 5 चौकारांसह 1 षटकार लागला. यष्टीरक्षक केएल राहुलने 38 धावांची खेळी केली. तर कर्णधार अक्षर पटेलने 34 धावा केल्या. शेवटी संघाचा डाव सावरत ट्रिस्टन स्टब्सने नाबाद 34 धावांची शानदार खेळी केली. तर आशुतोष शर्माने 15 धावा केल्या.
189 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थानला 20 षटकांत 4 गडी गमावून फक्त 188 धावा करता आल्या. राजस्थानकडून नितीश राणा आणि यशस्वी जयस्वाल यांनी 51-51 धावा केल्या. संजू सॅमसनने 31 धावांचे योगदान दिले. तर ध्रुव जुरेल 26 धावांसह नाबाद राहिला. दिल्लीकडून मिचेल स्टार्क, अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. त्याआधी, अभिषेक पोरेलच्या 49 धावांच्या खेळीच्या जोरावर दिल्लीने 20 षटकांत 5 गडी गमावून 188 धावा केल्या. राजस्थानकडून जोफ्रा आर्चरने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या.
सुपर ओव्हरमध्ये राजस्थान रॉयल्सने दिल्ली कॅपिटल्सला 12 धावांचे लक्ष्य दिले. प्रथम फलंदाजी करताना राजस्थानने 11 धावा केल्या. शिमरन हेटमायरने 4 चेंडूत 6 धावा केल्या. 2 चेंडूत 4 धावा काढल्यानंतर रियान पराग धावबाद झाला. यशस्वी जयस्वाल खाते न उघडताच धावबाद झाला. सामना जिंकण्यासाठी दिल्लीला 6 चेंडूत 12 धावांची गरज होती.
दिल्लीसाठी सुपर ओव्हरमध्ये केएल राहुल आणि ट्रिस्टन स्टब्स फलंदाजीसाठी मैदानात उतरले. वेगवान गोलंदाज संदीप शर्माच्या पहिल्याच चेंडूवर राहुलने 2 धावा घेतल्या. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर त्याने उत्कृष्ट चौकार लगावला. तिसऱ्या चेंडूवर राहुलने 1 धाव घेतली आणि स्ट्राईक स्टब्सकडे दिली. स्टब्सने आक्रमक अंदाजात शानदार षटकार ठोकत दिल्लीला दमदार विजय मिळवून दिला.