पुणे : पुणे महापालिकेत १५६५ सुरक्षा रक्षकांच्या कंत्राटासाठी राजकीय वरदहस्त असलेल्या एकाच ठेकेदाराचे लाड पुरविण्यासाठी अटी शर्ती निश्चित केल्या असल्याची टीका सुरु झाल्यानंतर महापालिका प्रशासनाने एक पाऊल मागे घेतले आहे. हे काम एकाच ठेकेदाराला देण्याऐवजी हे काम अन्य ठेकेदारांनाही विभागून दिले जाईल असे आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी स्पष्ट केले. पण निविदेतील अटी शिथिल केल्यास स्पर्धा वाढून महापालिकेला आणखी चांगले ठेकेदार मिळतील यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.
महापालिकेच्या सुरक्षा विभागाने बहुउद्देशीय कामगार या नावाखाली १५६५ सुरक्षा रक्षक घेण्यासाठी १३९.९२ कोटी रुपयांची निविदा काढली आहे. ही निविदा तीन वर्षासाठी असणार आहे. यापूर्वी एका वर्षासाठीच निविदा काढली जात होती, यंदा थेट अटी शर्तीत बदल करून तीन वर्षासाठी निविदा काढली जात असल्याने यावर संशय व्यक्त केला जात आहे. महाराष्ट्रात सात वर्ष काम करण्याचा अनुभव अनिवार्य केल्याने अनेक कंपन्या या निविदेसाठी अपात्र ठरणार आहेत आहे. राज्यातील बड्या राजकारण्यांशी संबंधित एजन्सीला काम देण्यासाठी हा घाट घातला आहे. याविरोधात महापालिकेला ॲड. असीम सरोदे यांनी कायदेशीर नोटीसही बजावली आहे.
या निविदेसंदर्भात महापालिका आयुक्त म्हणाले, या निविदेसंदर्भात काही तक्रारी आल्या आहेत. यापूर्वीच्या निविदा आणि प्रत्यक्षात कार्यादेश दिल्यानंतर आलेला कामाचा अनुभव लक्षात घेउन निर्णय घेण्यात येईल. या निविदेची काम एकाच ठेकेदाराला देण्याऐवजी ते दोन तीन ठेकेदारांमध्ये विभागातून दिले जाईल.