PMC Update : पाण्याचे बिल न भरल्यास नळजोड बंद, महापालिकेच्या नावाने फसवणूकीचा प्रकार
esakal April 17, 2025 05:45 AM

पुणे : शहरातील नागरिकांना महापालिकेच्या नावाने पाणी बिल न भरल्यास नळजोड बंद करण्यात येईल, असे संदेश मोबाईलवर प्राप्त होऊ लागले आहेत. या गंभीर प्रकाराची महापालिका प्रशासनाने तातडीने दखल घेतली आहे. असे संदेश महापालिकेकडून पाठविण्यात येत नाहीत, अशा संदेशाद्वारे फसवणूक होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी त्यास बळी पडू नये, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.

शहरातील पाण्याची थकबाकी न भरल्यास नळजोड बंद करण्यात येतील, असे संदेश नागरिकांच्या मोबाईंवर मागील काही दिवसांपासून येत आहेत. याबाबत महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडे नागरिकांकडून तक्रारी आल्या होत्या. या तक्रारींची महापालिकने तातडीने दखल घेत, अशा स्वरुपाचे संदेश महापालिकेकडून पाठविले जात नसल्याचे पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप यांनी स्पष्ट केले.

नागरीकांनी अशा संदेशाला बळी पडू नये, नागरिकांनी अनोळखी मोबाईल क्रमांक व व्यक्ती यांचेसोबत कोणत्याही प्रकारचे ऑनलाइन व्यवहार करू नयेत. मोबाईलवर पाठविलेल्या संदेशातील लिंकला प्रतिसाद देऊ नये, असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे. महापालिकेच्या मीटर विभागाकडील मीटर बिलावर नागरिकांच्या सोयीसाठी महानगरपालिकेचा दुरस्थ सहाय्यक, व्हाट्स अप चॅटबॉट क्रमांक : ८८८८२५१००१ किंवा http://watertax.punecorporation.org याद्वारे मीटर बिलाची संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. तसेच ऑनलाइन बिल भरण्यासाठीची सुविधा देखील उपलब्ध केलेली आहे.

तरी, अधिक माहितीसाठी नागरिकांनी पुणे महानगरपालिकेच्या १८००१०३२२२ या कॉल सेंटर क्रमांकावर किंवा संबंधित मीटर रीडरकडे संपर्क साधावा असे आवाहन जगताप यांनी केले आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.