DC vs RR Live: अभिषेक पोरेल OUT होता, पण संजूने अपील न केल्यानं वाचला! Axar Patel ने मैदान गाजवलं, उभं केलं तगडं लक्ष्य
esakal April 17, 2025 05:45 AM

Delhi Capitals vs Rajasthan Royals Live Marathi Update: लोकेश राहुलने सातत्यपूर्ण खेळ कायम राखताना दिल्ली कॅपिटल्सला आधार दिला. त्याच्या सोबतीला अभिषेक पोरेल उभा राहिला, परंतु राजस्थान रॉयल्सच्या चतुर गोलंदाजीने धावांचा वेग संथ ठेवला. करुण नायरच्या दुर्दैवी रन आऊटने दिल्लीवर दडपण वाढले होते आणि त्याचाही संघाला कुठेतरी फटका बसला. अक्षर पटेलने वादळी फटकेबाजी करून मॅच पुन्हा दिल्लीच्या बाजूने झुकवली आणि त्याच्या या खेळीच्या जोरावर राजस्थानसमोर तगडे लक्ष्य उभं करता आले.

जॅक फ्रेझर-मॅकगर्क ( ९) पुन्हा एकदा अपयशी ठरला. समोर अभिषेक पोरेल खणखणीत फटकेबाजी करत असताना, जॅक नुसता उभा राहिला असता तरी चालले असते. पण, त्याने जोफ्रा आर्चरला फटका मारला आणि यशस्वी जैस्वालने सोपा झेल टिपला. त्याआधीच्या षटकात पोरेलने तुषार देशपांडेच्या सहा चेंडूंवर ४,४,६,४,४,१ अशा धावा चोपल्या होत्या. तरीही जॅकने घाई केली.

करुण नायर मैदानावर येताच स्टेडियमवर जल्लोष झाला, परंतु तो तीन चेंडूच टिकला. पोरेल व नायर यांच्यात संवादाच्या अभाव पाहायला मिळाला आणि चौथ्या षटकात करुण नॉन स्ट्रायकर एंडला झाला. यंदाच्या आयपीएलमध्ये दिल्लीचा सहावा फलंदाज रन आऊट झाला आहे आणि जी सर्वाधिक संख्या आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या गुजरात टायटन्सचे तीन खेळाडू रन आऊट झाले.

दिल्लीने ३ ते ६ षटकांत फक्त १३ धावा काढल्या आणि आयपीएल २०२४ नंतरही ही कोणत्याही संघाकडून झालेली नीचांक धावा आहेत. सलग दोन विकेट्स गेल्यानंतर दिल्लीच्या संघाला पोरेल व लोकेश राहुल या जोडीने सावरले आणि दोघांनी ४६ चेंडूंत अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. लोकेशचे सातत्य दिल्लीसाठी फायद्याचे ठरलेले आहे. जोफ्रा आर्चरने संथ चेंडूचा मारा करून या जोडीला विचलित केले. ५७ चेंडूंत ६३ धावांची ही भागीदारी लोकेशच्या ( ३८) विकेटनंतर तुटली. शिमरोन हेटमायरने चांगला झेल घेतला.

आर्चरच्या त्याच षटकाच्या पाचव्या चेंडूवर पोरेलला बाऊन्सर फेकला. पोरेलने त्यावर अपर कट मारण्याचा प्रयत्न केला, परंतु चेंडू यष्टिरक्षक संजूच्या हाती विसावला. पण, चेंडू व बॅटचं कनेक्शन झालं होतं आणि अपील न केल्याने तो नाबाद राहिला. पण, पुढच्या षटकात मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात त्याची विकेट पडली. पोरेलने ३७ चेंडूंत ५ चौकार व १ षटकारासह ४९ धावा केल्या. १५ षटकांच्या समाप्तीनंतर दिल्लीच्या ४ बाद १११ धावा झाल्या होत्या आणि त्यानंतर पुढील पाच षटकांत अक्षर पटेल व त्रिस्तान स्तब्स यांनी चांगली फटकेबाजी केली. अक्षरने सामन्याचा गिअर बदलला.

अक्षर १४ चेंडूंत ४ चौकार व २ षटकारांसह ३४ धावांवर बाद झाला. स्तब्स व आशुतोष शर्मा यांनी दिल्लीला ५ बाद १८८ धावांपर्यंत पोहोचवले. संदीप शर्माने शेवटच्या षटकांत निराश केले, त्यात महीश थीक्षणाने एकदम हलवा झेल टाकला. स्तब्स १८ चेंडूंत २ चौकार व २ षटकारांच्या मदतीने ३४ धावांवर नाबाद राहिला, तर शर्माने ११ चेंडूंत नाबाद १५ धावा केल्या. संदीपने त्याच्या शेवटचं षटक पूर्ण करण्यासाठी ११ चेंडूं टाकले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.