Maharashtra Government : मुंबई, ठाणे, पुण्यासह २७ मनपासाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, केरळच्या धर्तीवर उपक्रम राबवणार
Saam TV April 17, 2025 02:45 PM

Robotic manhole cleaning : सफाई कर्मचाऱ्यांचे मॅनहोल आणि गटार सफाईदरम्यान होणारे मृत्यू रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील २७ महापालिकांसाठी १०० अत्याधुनिक रोबोट खरेदी करण्याची घोषणा सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी केली आहे. मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, नाशिक, सोलापूर,अमरावतीसह प्रमुख शहरांमध्ये या रोबोटचा वापर केला जाणार आहे. केरळ राज्यात रोबोटचा यशस्वी प्रयोग करण्यात आला होता.

आता केरळमदील यशस्वी प्रयोगाच्या धर्तीवर हा उपक्रम राबवला जाणार आहे. केंद्र सरकारच्या सामाजिक ऑडिटमध्ये सफाई कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसंदर्भातील गंभीर त्रुटी समोर आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे, ज्यामुळे कर्मचाऱ्यांच्या जीविताला संरक्षण मिळू शकतेय.

मुंबई, ठाणेसह जास्त मोठ्या शहरांमध्ये मॅनहोलची सफाई करताना दुर्घटना घडतात, त्यामध्ये अनेकदा सफाई कर्मचाऱ्यांचा जीव जातो. ही गंभीर बाब लक्षात घेऊन राज्य सरकारने रोबोट खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढे मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, नाशिक, अमरावती यासारख्या महापालिकेत रोबोटद्वारे मॅनहोल सफाई होईल. त्यासाठी १०० रोबेटची खरेदी करण्याची तयारी दर्शवली आहे.

सध्या देशभर अनेक शहरात सफाई कामगारांना प्रत्यक्ष मॅनहोलमध्ये उतरवून सफाई केली जाते. सफाई करताना गटारातील गॅसमुळे अनेकांचा जीव गेलाय. या प्रकरणाची गंभीर दखल घेत केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने अशा कामांचे सामाजिक लेखापरीक्षण केले होते. सफाई कर्मचाऱ्यांच्या मृत्यूची दखल घेण्यात अपयशी ठरल्याबद्दल राज्य सरकारवर ताशेरेही ओढले होते. त्यामुळे मॅनहोलच्या सफाईसाठी रोबोट खरेदी करण्याचा प्रस्ताव समोर आला आहे. त्याला महाराष्ट्र सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला. महाराष्ट्र सरकार मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, नाशिक, अमरावती यासारख्या २७ महापालिकांसाठी १०० रोबोट खरेदी करणार आहे.

सोलापूरमध्ये दोन रोबोट दाखल

चेंबरमधील अडथळे शोधण्यासाठी दोन रोबोट सोलापूरमध्ये दाखल झाले आहेत. सोलापूर शहरातील दूषित पाणी, चेंबरमधील अडथळ्यांचा शोध घेण्यासाठी दोन रोबोट महापालिकेत दाखल झाले आहेतय मंगळवारी १५ ते ३० एप्रिलपर्यंत रोबोटच्या कामाची पद्धत जाणून घेऊन त्याच्या कामाची चाचणी होईल. महापालिका कर्मचाऱ्यांना त्या संदर्भात प्रशिक्षण दिले जाणार आहे. या कामासाठी रोबोट उपयुक्त ठरल्यास महापालिका दोन रोबोट खरेदी करणार आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.