गुरुग्राम जमीन घोटाळा प्रकरणात दुसऱ्या दिवशीही जबानी
वृत्तसंस्था/ .नवी दिल्ली
हरियाणा जमीन घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात चौकशीसाठी काँग्रेस खासदार प्रियंका गांधी वड्रा यांचे पती आणि उद्योगपती रॉबर्ट वड्रा बुधवारी ईडी कार्यालयात पोहोचले. याप्रसंगी प्रियांकाही आपल्या पतीसोबत ईडी कार्यालयात पोहोचल्या होत्या. रॉबर्टवड्रा चौकशीसाठी अधिकाऱ्यांसमोर गेल्यानंतर प्रियंका गांधी वेटिंग रूममध्ये बसल्या होत्या. चौकशीसाठी जाण्यापूर्वी रॉबर्ट वड्रा यांनी माध्यमांशी संवाद साधला. सध्या आम्ही निशाण्यावर असलो तरी आम्ही कोणाला घाबरत नाही. या चौकशीच्या फेऱ्यांमुळे आम्ही आणखी मजबूत होणार आहोत, असे ते म्हणाले.
रॉबर्ट वड्रा यांची बुधवारी जवळपास साडेपाच तास चौकशी करण्यात आली. या चौकशीनंतर त्यांना बाहेर सोडण्यात आले असून हे सत्र गुरुवारीही सुरू राहणार आहे. 2008 मधील शिकोहपूर जमीन व्यवहार प्रकरणात याआधी मंगळवारी ईडीने रॉबर्ट वड्रा यांची अनेक तास चौकशी केली होती. या कारवाईबाबत वड्रा यांनी तपास यंत्रणांचा गैरवापर केला जात असल्याचे म्हटले होते. आपल्याविरुद्ध कट रचला जात आहे. हे संपूर्ण प्रकरण बरेच जुने असून तावडू येथील रहिवासी सुरेंद्र शर्मा यांच्या तक्रारीवरून 1 सप्टेंबर 2018 रोजी गुरुग्राममधील खेरकी दौला पोलीस ठाण्यात रॉबर्ट वड्रा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
वड्रा यांच्या कंपनीने फेब्रुवारी 2008 मध्ये गुडगावच्या शिकोहपूर येथे ओंकारेश्वर प्रॉपर्टीजकडून 7.5 कोटी रुपयांना 3.5 एकर जमीन खरेदी केली होती. व्यावसायिक परवाना मिळाल्यानंतर कंपनीने तीच मालमत्ता डीएलएफला 58 कोटी रुपयांना विकली, असा आरोप तक्रारदाराने केला आहे. या प्रकरणात ईडी वड्रा यांच्या कंपनीतील आर्थिक अनियमिततांची चौकशी करत आहे.
रॉबर्ट वड्रा यांच्या स्कायलाईट हॉस्पिटॅलिटी कंपनीवर इतरांशी संगनमत करून फसवणूक केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपेंद्र हु•ा यांनाही आरोपी करण्यात आले आहे. या प्रकरणी भादंविच्या कलम 420, 120, 467, 468 आणि 471 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर आयपीसीच्या कलम 423 अंतर्गत नवीन आरोप जोडण्यात आले होते.