राहुरी : शहरात राष्ट्रपुरुषाच्या पुतळ्याची विटंबना झाली. त्यास २२ दिवस झाले. आरोपींना येत्या ४८ तासांत अटक करावी; अन्यथा लढा मुंबईत नेऊ. मुख्यमंत्री तथा गृहमंत्री, पोलिस महानिरीक्षकांना भेटू. राज्यात लढा उभारू. तपास लागल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा इशारा राज्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिला.
राष्ट्रपुरुषाच्या पुतळ्याच्या विटंबना प्रकरणातील आरोपींना अटक करावी, या मागणीसाठी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी राहुरीत उपोषण सुरू आहे. आज (बुधवारी) सायंकाळी उपोषणस्थळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात, खासदार नीलेश लंके यांनी उपोषणस्थळी भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. वरील नेत्यांच्या विनंतीला मान देऊन माजी मंत्री तनपुरे यांनी आज तिसऱ्या दिवशी अन्नत्याग उपोषण सोडले.
यावेळी माजी खासदार प्रसाद तनपुरे, माजी आमदार दादाभाऊ कळमकर, शिवसेना (ठाकरे गट) जिल्हाध्यक्ष रावसाहेब खेवरे, अप्पर पोलिस अधीक्षक वैभव कलुबर्मे, पोलिस उपअधीक्षक डॉ. बसवराज शिवपुजे, सुरेश वाबळे, बाबासाहेब भिटे, नितीन बाफना, सुनील आडसुरे, मच्छिंद्र सोनवणे, संतोष आघाव, रिपाइंचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, तालुकाध्यक्ष विलास साळवे, यशवंत सेनेचे जिल्हाध्यक्ष विजय तमनर, स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे, युवा नेते हर्ष तनपुरे, ॲड. अभिषेक भगत उपस्थित होते.
दानवे म्हणाले की, राष्ट्रपुरुषांचा अवमान करणाऱ्या समाज कंटकांचे हात छाटले पाहिजे. तरुणांचे माथे भडकवणारी यंत्रणा राज्यात उभी राहिली आहे. त्यामुळे राहुरीतील घटनेविषयी शंका निर्माण होत आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी कुणाच्या दबावाखाली काम करू नये. राष्ट्रपुरुषाच्या पुतळ्याची विटंबना संवेदनशील भावनेचा विषय आहे. तपास अयोग्य असेल, तर अधिकाऱ्यांवर कारवाई करावी लागेल. आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी माजी मंत्री तनपुरे अन्नत्याग उपोषणाला बसले. त्यांच्या भावना मान्य आहेत. त्यांच्या मतदारसंघात भवानी मातेच्या मंदिराला धक्का लावला जातो. स्थानिक लोक प्रशासनावर प्रभाव टाकतात. राज्यात व जिल्ह्यात असेच चालू आहे. उपोषण तूर्त थांबवा. आंदोलन थांबवा, म्हणत नाही, असेही दानवे म्हणाले.
माजी मंत्री थोरात म्हणाले, ‘‘छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सहा महिन्यांत कोसळतो. पुतळ्याच्या कामात भ्रष्टाचार होतो. माजी राज्यपालांसह सोलापूरकर, कोरटकर छत्रपतींच्या विषयी अवमानकारक वक्तव्य करतात. राहुरीत पुतळ्याची विटंबना होते, असे प्रकार जाणीवपूर्वक सुरू आहेत. महागाई, बेरोजगारी, शेतकरी, कामगार, युवक, विद्यार्थी, शिक्षक यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष व्हावे, जाती-धर्मात तेढ निर्माण करून राजकारण करता यावे, असा उद्देश सत्ताधाऱ्यांचा आहे. जनतेने वेळीच सावध व्हावे. तनपुरेंनी उपोषण सोडावे.’’
खासदार लंके म्हणाले, ‘‘अन्नत्याग उपोषणाचा तिसरा दिवस आहे. शरीराची प्रचंड हानी होते. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे यांनी काल (मंगळवारी) मोबाईलवर संपर्क साधून प्राजक्त तनपुरे यांना उपोषण सोडावे, असे सुचविले आहे. आरोपीला अटक करण्यासाठी वेगळी रणनीती आखली जाईल. राज्यभर लढा उभारला जाईल. तूर्त वरिष्ठ नेत्यांच्या सूचनेनुसार उपोषण मागे घ्यावे."
राहुरीत राष्ट्रपुरुषाच्या पुतळ्याची विटंबना होते. समाजकंटक मोकाट फिरतोय, यासारखे दुर्दैव नाही. आरोपीचे मनोबल उंचावून पुन्हा एखाद्या महापुरुषाची विटंबना होऊ शकते. अशा माथेफिरूला अटक झाली पाहिजे. राहुरी शहरात धर्म-जातीत एकोपा व शांतता राहिली पाहिजे, एवढीच प्रामाणिक भावना आहे. आरोपीला अटक होईपर्यंत लढा कायम राहील.
- प्राजक्त तनपुरे, माजी मंत्री
तब्येत बिघडली..!उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी आज माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांची तब्येत बिघडली. त्यांचे वजन अडीच किलो घटले. तरी त्यांनी रुग्णालयात जाण्यास नकार दिला. त्यांना उपोषणस्थळी सलाईन लावण्यात आले. उपोषणकर्ते पप्पू कल्हापुरे यांची तब्येत खालावल्याने त्यांना ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले.