कामठी : नवीन कामठी पोलिस ठाणे हद्दीतील कामठी-कळमना मार्गावरील सुपारेनगर न्यू येरखेडा येथील तरुणाने मित्राच्या विरहात स्वतःच्या राहत्या घरी विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (ता.१४) सायंकाळी सातच्या सुमारास उघडकीस आली. सचिन उर्फ पप्पू वामन देशमुख (वय ३०) असे मृत तरुणाचे नाव आहे.
नवीन कामठी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सचिन उर्फ पप्पू वामन देशमुख हा आई-वडिलांसह वास्तव्यास असून सचिन देशमुख हा वडिलांसह साहित्य विक्रीचा व्यवसाय करीत होता.
सचिन देशमुखचा मित्र मोनल रामू जगनाडे (वय ३५, नेहरू मंच मोंढा, कामठी) याने राहत्या रविवारी घरी दोराने गळफास लावून आत्महत्या केली होती. दोघांची मोठी जवळीक मैत्री असल्याने सचिन उर्फ पप्पू वामन देशमुख यांनी सोमवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास राहत्या घरी बेडरूममध्ये विष प्राशन केले.
सचिन प्रकृती खालावल्याने बेशुद्ध होऊन पडला आई व वडिलांनी लगेच त्याला उपचारासाठी कामठी उपजिल्हा रुग्णालयात घेऊन गेले. डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. घटनेची माहिती नवीन कामठी पोलिस ठाण्याला दिली असता पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला.
व नवीन कामठी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पुढील तपास नवीन कामठी पोलिस करीत आहेत. दोन्हीही तरुणांच्या आत्महत्तेने नातेवाईकांमध्ये हळहळ करण्यात येत आहे.