नाशिक- काठे गल्ली सिग्नलनजीकचे अतिक्रमित धार्मिक स्थळ हटविण्याच्या पार्श्वभूमीवर कडेकोट पोलिस बंदोबस्त असताना मंगळवारी (ता. १५) रात्री साडेअकरानंतर जमाव जमू लागल्याने ‘अलर्ट मोड’वर आलेल्या पोलिस अधिकारी आणि जादा फौजफाटा काठे गल्ली सिग्नलच्या दिशेने पोहोचला.
आक्रमक जमावाने पोलिस उपायुक्तांच्या वाहनावर दगडफेक केली; तर अनेक दुचाकींचे नुकसान करीत पोलिसांवर चालून गेले. परंतु, पोलिसांनीही जमावाला पांगविले. अवघ्या ३० मिनिटांत परिस्थिती नियंत्रणात आल्यावर मात्र पोलिसांनी परिसरात दडून बसलेल्यांसह समाजकंटकांची धरपकड सुरू केली.
धार्मिकस्थळ हटविण्यापूर्वी परिसरात पोलिसांचा मंगळवारी सकाळपासूनच मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. तसेच, धार्मिक स्थळाकडे येणारे चारही रस्ते बॅरिकेटींग करून बंद करण्यात आले. रात्री अकरा-साडेअकरानंतर मात्र अतिक्रमित धार्मिक स्थळाच्या दिशेने जमाव जमू लागला. काही मिनिटांमध्ये शे-पन्नास जमाव हजार-दीड हजारांचा झाल्याने पोलिसांनीही कुमक वाढविली. परिमंडळ एकचे उपायुक्त किरणकुमार चव्हाण, प्रशांत बच्छाव, सहायक आयुक्त नितीन जाधव, संदीप मिटके यांच्यासह अधिकारी व अंमलदारांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.
उपायुक्तांचे वाहन फोडले
शहर गुन्हेशाखेचे उपायुक्त प्रशांत बच्छाव हे वाहनातून अतिक्रमित धार्मिकस्थळाच्या दिशेने आले. त्यावेळी समोर असलेल्या जमावाने त्यांच्या वाहनावर अचानक दगडफेक करीत हल्ला चढविला. चालक, उपायुक्त प्रशांत बच्छाव, पोलिस शिपाई यांनी हेल्मेट व अंगात सुरक्षारक्षक जॅकेट परिधान केलेले असल्याने ते बचावले.
अन् धरपकड सुरू
बारा-सव्वा बाराच्या दरम्यान जमाव आक्रमक होऊन पोलिसांवर चालून गेला. सौम्य बळाचा वापर सुरू केला. दीडच्या सुमारास जमाव पांगविण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी समाजकंटकांची धरपकड सुरू केली.
आयुक्तांचा ग्रुप कॉल अन्...
मंगळवारी मध्यरात्री अचानक परिस्थिती तणावपूर्ण होताच, पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी उपायुक्त, सहाय्यक आयुक्त व प्रभारी अधिकाऱ्यांचा ग्रुप कॉल घेतला. सर्व अधिकाऱ्यांना तत्काळ घटनास्थळाकडे रवाना करण्यात आले. त्यामुळे पुढच्या १० मिनिटांत सुमारे ६० पोलिस वाहने, अधिकारी काठे गल्ली सिग्नल परिसरात पोहोचले.