जुने नाशिक- धार्मिक स्थळाचे अतिक्रमण हटविण्यावरून मंगळवारी (ता. १५) रात्री मोठ्या जमावाकडून या परिसरात दगडफेक करण्यात आली. त्यात तीन पोलिस वाहनांचे नुकसान झाले; तर २१ पोलिस अधिकारी व कर्मचारी जखमी झाले. परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याने पोलिसांकडून अश्रुधुराचा मारा करीत जमाव पांगविण्यात आला. या सर्व घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
काठे गल्ली सिग्नल परिसरातील धार्मिक स्थळ काढून घेण्याबाबत मंगळवारी रात्रीच्या सुमारास दर्गा विश्वस्त, समाजातील प्रतिष्ठित नागरिक, पोलिस आणि महापालिका अधिकारी यांच्यात चर्चा सुरू होती. यावेळी उस्मानिया चौकाकडून आलेल्या जमावाने अचानक गोंधळ घालत दगडफेक करण्यास सुरुवात केली. काही वेळातच तणावाची परिस्थिती निर्माण झाली. परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली.
घटनेची माहिती कळताच पोलिस मोठ्या संख्येने परिसरात दाखल झाले. यावेळी पोलिसांवर झालेल्या दगडफेकीत तीन पोलिस वाहनांचे नुकसान झाले. दोन सहाय्यक पोलिस आयुक्त दोन ते चार पोलिस निरीक्षक यांच्यासह अन्य पोलिस कर्मचारी असे २१ जण जखमी झाले. अर्धा तासानंतर परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात आले. पोलिसांनी कारवाई करत सुमारे १९ जणांना ताब्यात घेतले आहे. तसेच घटनास्थळ आणि संशयितांकडून सुमारे १०० दुचाकी जप्त केल्या आहे.
घडलेल्या घटनेनंतर परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पोलिसांनी अतिरिक्त पोलिस बंदोबस्त कायम ठेवला आहे. पोलिस व्यतिरिक्त इतर कोणासही प्रवेश देण्यात आलेला नाही. जप्त करण्यात आलेले वाहने सरकारवाडा पोलिस ठाण्यात जमा करण्यात आली आहे.
फायरिंगच्या आवाजाने घाबरले रहिवासी
मंगळवारी (ता. १५) रात्री जमावाने केलेल्या दगडफेकीनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराचा मारा करावा लागला. अश्रुधुराची फायरिंग करीत असताना मोठा आवाज होत होता. रात्री शांतता असल्याने फायरिंगचा आवाज सर्वदूर पोहोचला होता. त्यामुळे धार्मिक स्थळ परिसरासह काठे गल्ली, वृंदावननगर, जनरल वैद्यनगर, उस्मानिया चौक, पखाल रोड भागातील रहिवासी प्रचंड धास्तावले होते.