बॉलिवूड अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता अनुराग कश्यप आपल्या रोखठोक मतांसाठी ओळखला जातो. नुकतीच त्याने मायानगरी मुंबई सोडण्याचा निर्णय घेत बंगळुरुला स्थायिक होण्याचा निर्णय घेतला होता. तसेच बॉलीवूडला ‘टॉक्सिक’ म्हणत त्याने चित्रपटसृष्टीलाही रामराम केला होता. मात्र आता त्याने यावर स्पष्टीकरण दिले असून मी शहर बदलले आहे, मात्र चित्रपट निर्मिती सोडलेली नाही, असे म्हटले आहे. याबाबत त्याने आपल्या एक्स (ट्विटर) अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे.
अनुराग कश्यपने ट्विटर पोस्टमध्ये म्हटले की, मी शहर बदललेले आहे, चित्रपट निर्मिती सोडलेली नाही. ज्यांना वाटतेय मी निराश झालोय, खचलोय आणि निघून गेलोय त्यांना सांगतो मी इथेच आहे आणि मी शाहरूख खान याच्यापेक्षाही जास्त व्यस्त आहे. अर्थात असायलाच हवे, कारण मी जास्त पैसे कमवत नाही. माझ्याकडे 2028 पर्यंत तारखा नाही.
हे वाचा – जातीव्यवस्था आहे की नाही ते ठरवा, फुले चित्रपटावरून दिग्दर्शक अनुराग कश्यपचा केंद्र सरकारला टोला
माझे पाच चित्रपट यंदाच्या वर्षी प्रदर्शित होतील अशी आशा आहे. कदाचित तीन या वर्षी आणि दोन पुढच्या वर्षीच्या सुरुवातीला प्रदर्शित होतील. माझ्या जास्त आयएमडीबी असून मी इतका कामात गुंतलेलो आहे की दिवसाला 3 प्रोजेक्टला नकार देतोय, असेही अनुरागने स्पष्ट केले. तसेच ट्रोल करणाऱ्यांनाही त्याने त्यांच्याच भाषेमध्ये सुनावले. तुम्ही खूपच लवचिक असाल तर तुमचे स्वत:चे **** चाटून घ्या, अशा शब्दात त्याने ट्रोल करणाऱ्यांचा समाचार घेतला.
दरम्यान, याच वर्षाच्या सुरुवातीला ‘द हिंदू’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये अनुराग कश्यपने मुंबई सोडण्याचा निर्णय जाहीर केला होता. तसेच बॉलीवूडमधील टॉक्सिक वातावरणामुळे चित्रपटसृष्टीला रामराम करण्याचाही निर्णय घेतला होता. मात्र अवघ्या काही महिन्यांमध्ये त्याने घुमजाव करत आपण चित्रपट निर्मिती सोडलेली नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे त्याच्या चाहत्यांना दिलासा मिळाला असून आगामी काळात अनेक उत्तमोत्तम चित्रपट पहायला मिळतील अशी आशा आहे.