
काही महिन्यांपूर्वी बुलढाणा जिह्यात नागरिकांच्या केस गळतीचा धक्कादायक प्रकार उघड झाला होता. त्यानंतर आता या प्रकरणाने गंभीर वळण घेतले आहे. बुलढाणा जिह्यातील शेगाव, नांदुरा, खामगाव तालुक्यातील ज्या लोकांचे केस गळले होते, त्यांच्यात आता नख गळतीची समस्या बघायला मिळत आहे. या रुग्णांची नखे अचानक विद्रूप होऊन नखे कमजोर होऊ लागली आहेत, तर अनेकांची नखे गळून पडली असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आलेले आहे. यामुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सेलेनियमच्या वाढत्या प्रमाणामुळे ही समस्या निर्माण झाल्याचा अंदाज आरोग्य अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. बुलढाणा जिह्याच्या शेगावमधील बोंडगावमध्ये गेल्या साडेतीन महिन्यांपासून केस गळतीचा आजार आला आहे. या केस गळतीच्या आजाराने संपूर्ण परिसरातील नागरिक हैराण झाले होते. त्यानंतर या ठिकाणी आयसीएमआरच्या पथकाने येऊन पाहणी करत काही नमुनेदेखील तपासणीसाठी घेतले होते.
याबाबत माहिती देताना बुलढाणा आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बनकर यांनी सांगितले की, एकूण चार गावांमध्ये नखांची समस्या असलेले रुग्ण आढळून आले. काही रुग्णांमध्ये नखांची गळती होत आहे. चार गावांमध्ये सध्या एकूण 29 रुग्ण आढळून आले.