ठाणेकरांनो.. कार, बाईक, रिक्षा ओल्या कपड्याने पुसा! पाणीटंचाईची झळ… विहिरी, बोअरिंग आटल्या
Marathi April 18, 2025 01:38 PM

कडक उन्हाळा सुरू असल्याने ठाणे जिल्ह्यातील धरणे आटू लागली आहेत. त्याचबरोबर विहिरी, बोअरिंगची पाणी पातळीदेखील खालावत चालली असल्याने भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे पाणी बचतीसाठी ठाणे पालिका नवनवीन फॉर्म्युला तयार करीत असताना शहरातील सर्व सर्व्हिस सेंटर 10 जूनपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. सर्व्हिस सेंटरवर वाहने घुणे व इतर साफसफाई करण्याच्या कामावर प्रशासनाने निर्बंध घातले आहेत. त्यामुळे ठाणेकरांनो आपली कार, बाईक, रिक्षा फक्त ओल्या कपड्याने पुसून घ्या, असे आवाहन करण्यात आले आहे.

सर्व्हिस सेंटर 10 जूनपर्यंत बंद; महापालिकेचे आदेश
पाण्याची बचत करण्यासाठी ठाणे पालिका प्रशासनाने शॉवरखाली अंघोळ करू नये तसेच आठवड्यातून एकदाच कपडे धुवा अशा सूचना पालिकेने दोन दिवसांपूर्वी केल्या. मात्र अनेक ठिकाणी सर्व्हिस सेंटरमध्ये निष्काळजीपणे वाहने धुणे व इतर साफसफाईची कामे सुरू असल्याचे निदर्शनास आल्यानंतर प्रशासनाने आता कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. पालिकेकडून अधिकृतरीत्या कोणतीही पाणी कपात जाहीर करण्यात आलेली नाही. पाण्याचा अपव्यय टाळूया, पाणी वाचवू या आणि संभाव्य पाणीटंचाईचा सामना एकत्रितपणे करूया, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.

अन्यथा दंडात्मक कारवाई
सध्या पाण्याची बचत करणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच पाण्याची बचत कशी करावी, यासाठी प्रत्येक प्रभागात लाऊडस्पिकरद्वारे आवाहन करण्यात येणार आहे. वाहने धुणे व इतर साफसफाई करण्याच्या कामावर महापालिकेमार्फत कडक निर्बंध घातले आहेत. या आदेशाचे उल्लंघन झाल्यास सर्व्हिस सेंटरवर दंडात्मक कारवाई महापालिका करणार आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.