
उरण तालुक्यातील 35 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी 23 एप्रिल रोजी आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. जेएनपीएच्या कामगार वसाहतीतील बहुउद्देशीय सभागृहात सकाळी 11 वाजता ही सोडत होणार असून इच्छुक उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. सोडतीसाठी विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
उरण तालुक्यातील 35 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी आरक्षण सोडत पद्धतीने करण्याचे आदेश जिल्हाधिकारी किसन जावळे यांनी तहसीलदारांना दिले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर 2025 ते 2030 या पाच वर्षांच्या सरपंचपदाची सोडत पद्धतीने आरक्षण जाहीर करण्यासाठी उरण तहसीलदार डॉ. उद्धव कदम यांनी 23 एप्रिल रोजी बैठक बोलावली आहे. जेएनपीएच्या कामगार वसाहतीतील बहुउद्देशीय सभागृहात सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आलेल्या आरक्षण सोडतीमध्ये खुल्या गटासाठी 11 सरपंचांची पदे व महिलांसाठी 11 पदे आरक्षित करण्यात येणार आहेत. नागरिकांच्या मागास खुल्या प्रवर्गासाठी 4 तर महिलांसाठी 5 जागा आरक्षित करण्यात येणार आहेत. अनुसूचित जमातीतील खुल्या गटासाठी 2 तर महिलांसाठी 1 जागा आरक्षित करण्यात येणार आहे तर अनुसूचित जातीतील खुल्या गटासाठी 1 जागा आरक्षित असणार आहे.