नवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे माजी आमदार आणि गुजरातमध्ये पक्षाचे सह-प्रभारी दुर्गेश पाठक यांच्या निवासस्थानी सीबीआय अधिकाऱ्यांनी गुरुवारी छापा टाकला आहे. तपास यंत्रणेच्या या कारवाईमुळे आम आदमी पक्ष संतप्त झाला आहे. ‘आप’ने सीबीआयच्या या कारवाईला गुजरातशी जोडले आहे. सीबीआयला माझ्या घरातून काहीच मिळाले नाही, सीबीआयने या कारवाईमागील कारण देखील सांगितले नसल्याचा दावा पाठक यांनी केला आहे. माझ्या घरी अनेक लोक स्वत:चे काम घेऊन येत असतात. हे लोक सर्वसाधारणपणे स्वत:च्या आधारकार्डाची प्रत जमा करतात आणि सीबीआयचे अधिकारी याच प्रती घेऊन गेले आहेत असा दावा पाठक यांनी पत्रकार परिषद घेत केला आहे. आम आदमी पक्षाच्या नेतृत्वाने मला गुजरातमध्ये पक्षाचा सह-प्रभारी नियुक्त केल्याने आणि गुजरातमध्ये आमच्या पक्षाचे वाढते बळ पाहता मला घाबरविण्यासाठी ही कारवाई करण्यात आली असावी, असे पाठक म्हणाले.