डोक्यावर पदर आणि साडीत वावर ; मुंबईत आधुनिक राहणाऱ्या रेणुका सासरी पाळतात परंपरा ; "राणाजींनी मला.."
esakal April 18, 2025 04:45 PM

Marathi Entertainment News : मराठी आणि बॉलिवूड इंडस्ट्रीमधील अभिनयसंपन्न अभिनेत्री म्हणजे रेणुका शहाणे. रेणुका यांनी आजवर अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. हम आपके है कौन या सिनेमासाठी त्या विशेष ओळखल्या जातात. त्यातच नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांनी त्यांच्या सासरच्या प्रथा आणि परंपरेविषयी धक्कादायक खुलासा केला. ज्यावर चाहतेही चकित झाले.

रेणुका यांनी 2001 मध्ये आशुतोष राणा यांच्याशी लग्न केलं. त्यांचा प्रेमविवाह झाला आणि हे त्यांचं दुसरं लग्न आहे. या आधी विजय केंकरे यांच्याशी त्यांचं लग्न झालं होतं. नुकतीच त्यांनी कॅच अप या चॅनेलला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी त्यांच्या सासरच्या प्रथा आणि परंपराविषयी धक्कादायक खुलासा केला. ज्यावर चाहत्यांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत.

सासरी गेल्यावर त्या अजूनही डोक्यावर पदर घेतात असं त्यांनी सांगितलं. यावर खुलासा करताना त्या म्हणाल्या की,"मलाही माझ्या सासरी प्रथा-परंपरांचं पालन करावं लागलं. प्रश्नच नाही. माझ्यासाठी खूप मोठा बदल होता. मी अजूनही सासरी गेल्यावर डोक्यावर पदर घेते. माझ्या घरात असं काही शक्यच नव्हतं, माझ्या मित्र - मैत्रिणींच्या घरीही असं वातावरण नाहीये. पण माझे सासरे आणि कुटूंबांचे आध्यात्मिक गुरु यांच्यामुळे काही गोष्टी कडक शिस्तीत पाळल्या जायच्या. एकदा का तुम्ही त्या कुटुंबातले झालात की शक्य आहे. माझी त्या कुटूंबाचा भाग व्हायची इच्छा होती. मला कुणीही जबरदस्ती केली नाही. राणाजींनीही कधीच मला हे केलंच पाहिजेस असं सांगितलं नाही. "

"मला असं वाटायचं की एक तर मी अभिनेत्री, सगळ्यांनी 'हम आपके है कौन?' पाहिला होता. त्यामुळे मी मुंबईहून आलेली मुलगी वगैरे असं म्हणत आपोआपच एक अंतर तयार होतं. मला ते नको होतं. पण आता आम्ही इतके वर्षांपासून एकमेकांचे आहोत त्यामुळे प्रांताचं किंवा राज्याचं जे काही अंतर होतं ते सगळं गळून पडलं आहे. माझ्या ज्या जावा आहेत त्या माझ्या मैत्रिणीसारख्याच आहेत. आम्ही एकत्र धमाल करत असतो. मी जर आडमुठेपणा केला असता तर हे मला मिळालं नसतं. आता मी बघते सासरी या पद्धत उरलेल्या नाहीत. आमच्या ज्या सुना आलेल्या आहेत त्या डोक्यावर पदर घेत नाहीत. आम्ही त्यांना म्हणतच नाही की घ्या. त्या जीन्स घालतात. मी जशी माझ्या घरी आहे तशा त्या असतात."

रेणुका यांच्या या वक्तव्यावर संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. "रेणुका शहाणे यांना खूप दिवसांनी पाहिलं ऐकलं..त्याचं अनमोल हास्य अनुभवलं..खरंच खूप आनंद झाला त्यांना या इंटरव्ह्यू मध्ये भेटून.. अत्यंत मार्मिक काम, त्यांचा कामा विषयी प्रामाणिकपणा, नीतिमूल्ये जपणे, प्रत्येक काळानुसार स्वतःला बदलणे, स्वतः विषयी असलेला विश्वास, Mr राणा यांची मिळालेली वेळोवेळी साथ.. असे कितीतरी गुण रेणुकाजी यांच्यात दिसतात..","अरे काय भारी झालं catch up! खरोखर गप्पा रंगल्या, अमोल तू कमाल आहेस की इतक्या सहज सगळयांशी संवाद साधतोस. रेणुका शहाणे खरंच brilliant (शहाण्या) अभिनेत्री आणि ऐकत रहाव्या अशा!","खूपच खरं बोलल्या","मला हे खरं वाटत नाही" अशा कमेंट्स अनेकांनी त्यांच्या या वक्तव्यावर केल्या आहेत.

दरम्यान रेणुका यांचा देवमाणूस हा सिनेमा 25 एप्रिल 2025 ला रिलीज होतोय. महेश मांजरेकर यांच्याही या सिनेमात मुख्य भूमिका आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.