Ranjit Kasle: निलंबित PSI रणजीत कासलेची पोलीस दलातून हकालपट्टी, आरोपांवर काय कारवाई होणार?
esakal April 18, 2025 04:45 PM

The Timeline of Ranjit Kasle Case: बीड सायबर विभागातील निलंबित पोलीस उपनिरीक्षक (PSI) रणजीत कासले याची अखेर पोलीस खात्यातून बडतर्फी झाली असून, या कारवाईमुळे महाराष्ट्र पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे. रणजीत कासले याने गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावरून थेट धनंजय मुंडे, वरिष्ठ अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप करत अनेक व्हिडीओ व्हायरल केले होते. त्यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे प्रशासनाला कारवाई करावी लागली.

थेट बडतर्फी

छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे माननीय पोलीस महानिरीक्षक यांनी कलम ३११(२)(ब) अंतर्गत रणजीत कासले यांना बडतर्फ केल्याचे अधिकृतरित्या जाहीर करण्यात आले.

बोगस एन्काउंटरची ऑफर?

रणजीत कासले याने सोशल मीडियावर व्हायरल केलेल्या एका व्हिडीओमध्ये असा दावा केला की, मधील संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मीक कराड याच्या ‘बोगस एन्काउंटर’ची ऑफर मिळाली होती. यामुळे पोलीस यंत्रणेवर अविश्वासाचे वातावरण निर्माण झाले असून, संबंधित व्हिडीओंनी मोठा राजकीय आणि सामाजिक वाद निर्माण केला.

गुन्ह्यांची नोंद आणि अटकेची कारवाई

आज १८ एप्रिल २०२५ रोजी बीड पोलिसांनी रणजीत कासले याला अटक केली. त्याच्यावर शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा क्रमांक २१३/२५ अंतर्गत एससी/एसटी अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ३(१)(र) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कलमाअंतर्गत अनुसूचित जाती व जमातींवरील अपमानकारक वागणुकीसाठी कडक शिक्षा होऊ शकते.

कासलेच्या आरोपांकडे गांभीर्याने पाहिले जाईल का?

रणजीत कासले याचे आरोप केवळ वैयक्तिक पातळीवर नसून ते संपूर्ण पोलीस व्यवस्थेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करतात. त्यांच्या आरोपांची चौकशी होणार का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. जर ते आरोप सत्य असल्याचे सिद्ध झाले, तर बडतर्फी ही एक बाजू ठरेल आणि पोलीस दलाला मोठा धक्का बसू शकतो. कासले याच्या व्हिडीओंना समाजमाध्यमांवर संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. काहींनी त्यांच्या धाडसाची प्रशंसा केली, तर काहींनी त्यांना पोलिस दलाच्या प्रतिमेला धक्का पोहोचवणारा म्हटले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.