संजय सूर्यवंशी, साम टीव्ही
संपत्तीच्या वादातून सख्ख्या लहान भावाने आपल्या मोठ्या भावाचा काटा काढला आहे. धारदार शस्त्राने वार करत भावाची हत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही घटना नांदेड येथील बिलोली गावात घडली असून, या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी भावाला अटक केली आहे. तसेच त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीचे नाव नागेश असे असून, मयत भावाचे सुनील प्रल्हाद लाखे असे आहे. गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्यात संपत्तीच्या कारणावरून सतत वाद सुरू होता. तसेच सुनिल हा आपल्या पत्नीला शिवीगाळ करीत असल्याचं नागेशला खटकट होते. याच गोष्टीचा राग मनात धरून नागेशने सुनीलचा काटा काढायचे ठरवले.
नागेशने संतप्त होऊन धारदार शस्त्राने सुनीलवर हल्ला केला. तसेच त्याचा जागीच खून केला. विशेष म्हणजे खून केल्यानंतर नागेशने पोलिसांना 'माझ्या भावाला कुणीतरी मारलं' अशी खोटी माहिती देऊन पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, चौकशी करत खुनाचा उलगडा केला आणि सत्य सगळ्यांसमोर आले.
मयत सुनीलचे नातेवाईक कुणीही पुढाकार घेऊन तक्रार दाखल करत नसल्यामुळे, पोलीस उपनिरीक्षक शिवराज लोखंडे यांच्या तक्रारीवरून नागेश लाखेविरूद्ध याच्याविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बिलोली पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली असून, त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे. या धक्कादायक घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.