Gujarat Titans ची नाचक्की! आयपीएल लिलावात ज्याच्याकडे पाठ फिरवली, त्यालाच आता संघात एन्ट्री द्यावी लागली
esakal April 18, 2025 04:45 PM

Gujarat Titans recall player they ignored during IPL auction : गुजरात टायटन्सने आयपीएल २०२५ च्या उर्वरित हंगामासाठी श्रीलंकेचा अष्टपैलू खेळाडू दासुन शनकाला ताफ्यात सामावून घेतले आहे. दुखापतग्रस्त ग्लेन फिलिप्सच्या जागी त्याचा समावेश करण्यात आला आहे. सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात फिलिप्सच्या मांडीला दुखापत झाली होती. ही दुखापत गंभीर असल्याने तो आयपीएलमधून बाहेर पडला आहे. त्यामुळे त्याच्या जागी शनकाची निवड करण्यात आली आहे.

दासुन शनका यापूर्वी २०२३ मध्ये गुजरात टायटन्सकडून खेळला आहे. गुजरातने त्याला त्या हंगामात ७५ लाख रुपयांना करारबद्ध केले होते. शनका आयपीएलमध्ये केवळ एक हंगाम खेळला असून त्याने तीन सामन्यांत फक्त २६ धावा केल्या. त्या हंगामात त्याला गोलंदाजीची संधी मिळाली नव्हती. अशातच गेल्या मेगा लिलावात गुजरातने त्याला संघात घेतले नव्हते. परंतु, आता फिलिप्सच्या अनुपस्थितीत त्याला पुन्हा संधी देण्याची गरज संघाला भासली आहे.

शनकाच्या समावेशाने गुजरातला नवा जोश मिळण्याची अपेक्षा आहे. त्याच्या अनुभवाचा आणि अष्टपैलू कामगिरीचा फायदा संघाला कितपत होतो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

याशिवाय, गुजरातला आणखी एक धक्का बसला आहे. वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा ३ एप्रिल रोजी वैयक्तिक कारणास्तव मायदेशी परतला आहे. त्याच्या परतण्याबाबत अद्याप अस्पष्टता आहे. अद्यापपर्यंत त्याच्या जागी कोणत्याही खेळाडूची घोषणा झालेली नाही.

यंदाच्या हंगामात गुजरात टायटन्सने सहापैकी चार सामने जिंकले असून, ते गुणतक्त्यात दुसऱ्या स्थानावर आहेत. गुजरातचा पुढील सामना शनिवारी दुपारी अहमदाबाद येथे अव्वल स्थानावरील दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध होणार आहे. हा सामना जिंकून गुणतक्त्यात पहिले स्थान मिळवण्याचा गुजरातचा प्रयत्न असेल. चाहते या रोमांचक लढतीसाठी उत्सुक आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.