लायसन्स हमाल, रुग्णवाहिके अभावी जखमी रेल्वे प्रवाशांचे तडफडून बळी; डोंबिवली – वसई रेल्वे मार्गावर गोल्डन अवरमध्ये उपचार मिळेना
Marathi April 18, 2025 05:31 PM

डोंबिवली-वसई रेल्वे मार्गावरील अप्पर कोपर, भिवंडी, बापगाव, कामण व जुचंद्र या पाच रेल्वे स्थानकांवर अपघातांची संख्या वाढली आहे. अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना तत्काळ वैद्यकीय मदत मिळत नसल्यामुळे अनेकांचा हकनाक मृत्यू होत आहे. या मार्गावर एकाही स्थानकावर स्ट्रेचर हमाल, रुग्णवाहिकेची व्यवस्था नाही. परिणामी जखमी प्रवाशांना ‘गोल्डन अवर्स’मध्ये उपचार मिळत नाहीत. केवळ प्राथमिक उपचार मिळत नसल्याने जखमी प्रवासी तडफडून प्राण सोडतात. ढिम्म रेल्वे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे पोलिसांची धावपळही व्यर्थ ठरत आहे.

डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत 1 जानेवारी 2025 ते 15 मार्च 2025 या कालावधीत तब्बल 33 प्रवाशांचा मृत्यू झाला. तर 30 जण गंभीर जखमी झाले आहेत. या मार्गावर केवळ मोजक्या ट्रेन धावत असल्याने रात्री अपघात घडल्यास पोलिसांना पायपीट करत घटनास्थळी जावे लागते. दिवसाही ट्रेनची संख्या कमी असल्यामुळे जखमींना रुग्णालयात पोहोचवणे अत्यंत अडचणीचे होते. कल्याण रेल्वे स्थानकावर जसे अधिकृत लायसन हमाल आहेत तसेच डोंबिवली रेल्वे स्थानकातही असावेत यासाठी डोंबिवली लोहमार्ग पोलिसांनी वारंवार रेल्वे प्रशासनाकडे पत्रव्यवहार केला आहे. मात्र अद्याप कुठलीही ठोस कार्यवाही झाली नसल्याने रेल्वे प्रशासनाच्या दुर्लक्षाबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.