ठाकरेंचं भाषण सुरु असतानाच दोनदा राष्ट्रगीत वाजलं, उद्धव ठाकरेंचा भाजपला खोचक टोला; म्हणाले…
Marathi April 19, 2025 07:31 PM

उधव ठाकरे: भारतीय कामगार सेनेच्या 57 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी जोरदार हल्लाबोल केलाय. यावेळी त्यांनी फडणवीसांना सांगतो, आधी घाटकोपरमध्ये मराठी सक्ती करून दाखवा. घाटकोपरमध्ये प्रत्येक माणूस मराठी बोलला पाहिजे, असे करून दाखवा. हिंदीची सक्ती होऊ देणार नाही. आम्ही प्रेमाने सगळे ऐकू. पण सक्ती कराल तर तुमच्यासह उखडून टाकू, असा इशाराच त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) सरकारला दिला. तर उद्धव ठाकरेंच्या भाषणावेळी अचानक दोन वेळेस राष्ट्रवादी वाजले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपला (BJP) खोचक टोला लगावला. उद्धव ठाकरेंच्या वक्तव्याची आता जोरदार चर्चा रंगली आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले की, मराठी माणसाचे न्याय हक्क मिळवून देण्यासाठी शिवसेनेचा जन्म झाला आहे. प्रत्येक कामगाराचा शाखेसोबत समन्वय झालाच पाहिजे. खूप जणांना काही देता आलं नाही तरीसुद्धा ते हिंदुत्वासाठी आणि पक्षासाठी माझ्यासोबत राहिले. आज सुद्धा कायदे आणलेत, कामगारांनी त्याला विरोध केलाच पाहिजे. पण निवडणुकीच्या वेळेला आपण विस्कळीत असतो.  आता वक्फ बोर्ड आणला गेला, त्यामध्ये सुद्धा आपण जो प्रश्न विचारला तोच सुप्रीम कोर्टाने त्यांना विचारला. वक्फ बोर्डावर जर तुम्ही कायद्यानं गैर मुस्लिम माणूस ठेवताय तर आमच्या हिंदूंमध्ये सुद्धा तुम्ही उद्या काहीही करू शकता? आम्ही महाराष्ट्राचे मराठी कडवट आहोत, असे त्यांनी म्हटले.

जाहीरनाम्यावर कोणीच काही बोलत नाही

आपल्याला भांडणात गुंतवून ठेवून यांचे काय चाळे चालले आहेत ते पाहा. मुंबईत सुद्धा काही गोष्टी अदाणीच्या घशात घालायच्या आणि तुम्ही त्यावर बोलू नये म्हणून तुम्हाला भांडणात व्यस्त ठेवायचं. आता काय दुर्दैवाने सरकार आलं आहे ते आता जाहीरनाम्यावर  कोणीच काही बोलत नाही. तुम्ही मारलेल्या थापा ऐकून मतदान केलं असं आपण एक वेळ म्हणू. पण त्यावर आता कोणीच बोलत नाही. अजित पवार म्हणतात की, माझ्या भाषणात कर्जमाफीबाबत मी कधी बोललो ते तुम्ही मला दाखवा. हे कोणतं राजकारण आहे? असे म्हणत त्यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधला.

सक्ती कराल तर तुमच्या सकट उखडून फेकून देऊ

हिंदीची सक्ती पहिलीपासून याचं काय करायचं? आम्ही प्रेमाने सर्व ऐकू पण सक्ती कराल तर तुमच्या सकट उखडून फेकून देऊ. अनेक ठिकाणी मराठी शिकण्यासाठी उत्साह वाढत आहे. म्हणून त्यांना वाटलं तर आता हिंदी शिकवू या. महाराष्ट्रामध्ये मराठी सक्ती करण्याचा निर्णय हा माझ्या मंत्रिमंडळाने घेतला. जो महाराष्ट्रात राहिला, त्याला मराठी ही आलीच पाहिजे. हिंदीची सक्ती आम्ही होऊ देणार नाही हा भाग वेगळा आहे. इथे राहता, आमचं मीठ खाता आणि मराठी भाषेला तुम्ही विरोध करता. काही नततृष्ठ आमच्या निर्णयाच्या विरोधात कोर्टात गेले. आमचा सरकार पाडलं आणि आता त्यांचे पाय चाटत आहेत. हिंदीची सक्ती करायची असेलच तर फडणवीस यांना सांगतो. तुमचे जे जोशी आले होते ते बोलून गेले त्याच घाटकोपरमध्ये आधी मराठी सक्ती करून दाखवा. घाटकोपरमध्ये मराठी सक्ती करून दाखवा. प्रत्येकाला मराठी बोलता येत का ते दाखवा? असे आव्हान त्यांनी यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले.

उद्धव ठाकरेंचा भाजपला खोचक टोला

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, जर तुम्ही आमच्यावरती सक्ती करण्याचा प्रयत्न कराल तर आम्ही ती सक्ती झुगारून देऊ. प्रेमाने बोलाला तर ऐकू. पण जबरदस्ती कराल तर लाथ घालू, असे त्यांनी म्हटले. यानंतर मध्येच दोन वेळेस राष्ट्रगीत वाजले.  यावेळी उद्धव ठाकरे यांनी कोणी भाजपवाला आहे का? असे म्हणत भाजपला खोचक टोला लगावला. उद्या लगेच बातमी येईल, मध्येच जनगणमन सुरू झालं. जरा बघा, नको तिकडे बोटं घालू नका, असे मिश्कील भाष्य देखील त्यांनी केले.

https://www.youtube.com/watch?v=fdky96wyl5w

आणखी वाचा

आज सांगतो, भांडण मिटवून टाकलं, पण एकच अट…, उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंसमोर ठेवलेली ती अट कोणती?

अधिक पाहा..

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.