जोस बटलरचं शतक अवघ्या तीन धावांनी हुकलं, शेवटच्या षटकात काय झालं? स्वत:च केला खुलासा
GH News April 20, 2025 12:07 AM

आयपीएल 2025 स्पर्धेत एक वेगळात ट्रेंड पाहायला मिळत आहे. शतकाची काळजी न करता संघासाठी त्यावर पाणी सोडत असल्याचं दिसत आहे. पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यरनेही असंच केलं होतं. आता दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध गुजरात टायटन्स सामन्यातही असंच चित्र पाहायला मिळालं. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सन 20 षटकात 8 गडी गमवून 203 धावा केल्या आणि विजयासाठी 204 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान गुजरात टायटन्सने 19.2 षटकात 3 गडी गमवून पूर्ण केलं. या विजयात महत्त्वाचा वाटा होता तो जोस बटलरचा…त्याने 54 चेंडूत 11 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने नाबाद 97 धावांची खेळी केली. खरं तर त्याला शतक करण्याची संधी होती. शेवटच्या षटकात संघाला 10 धावांची गरज होती. पण तेवतियाने पहिल्या चेंडूवर षटकार आणि दुसऱ्या चेंडूवर चौकार मारून संघाला विजय मिळवून दिला. त्यामुळे जोस बटलरचं शतक अवघ्या तीन धावांनी हुकलं. जोस बटलरचं शतक पूर्ण झालं असतं तर आयपीएलमध्ये सर्वाधिक शतक ठोकणाऱ्या विराट कोहलीशी बरोबरी साधली असती. विराट कोहलीने आतापर्यंत 8 शतके ठोकली आहेत. तर जोस बटलरच्या नावावर 7 शतके आहेत. पण तीन धावांसाठी हे गणित चुकलं. पण शेवटच्या षटकात नेमका काय प्लान होता याबाबत स्वत: जोस बटलरने सांगितलं.

जोस बटलरने सांगितलं की, ‘तुम्हाला खेळ जिंकायचा आहे, त्यापूर्वी माझ्याकडे माझ्या संधी होत्या, दोन गुण ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. मी राहुलला सांगितले की माझ्या धावसंख्येची काळजी करू नको. आपल्याला जिंकायचे आहे. त्याचे श्रेय त्यालाच जातं, त्याने गेल्या काही वर्षांत असे केले आहे जिथे तो पहिल्या चेंडूपासून सीमा शोधू शकतो.’ दरम्यान जोस बटलरने मागच्या सहा सामन्यांबाबतही सांगितलं. ‘मी पहिल्या सहा सामन्यात खराब खेळ केला. मी चांगले खेळण्याचा प्रयत्न करण्याचा दृढनिश्चय केला होता. जेव्हा तुम्ही अशा खेळावर टिकून राहण्यास व्यवस्थापित करता तेव्हा नेहमीच छान होतं. मला त्याच्या (रुदरफोर्ड) सोबत फलंदाजी करायला मजा आली आहे. तो कुठूनही षटकार मारतो. मोहितला मारलेल्या षटकारांनी खेळ आणि गती बदलली. ‘, असंही जोस बटलर म्हणाला.

गुजरात टायटन्सने दिल्ली कॅपिटल्सचा पराभव केला आणि गुणतालिकेत अव्वल स्थान गाठलं आहे. 10 गुणांसह गुजरात टायटन्स अव्वल स्थानावर आहे. गुजरात टायटन्स, दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्स यांचे प्रत्येकी 10 गुण आहेत. पण नेट रनरेटच्या बाबतीत गुजरात टायटन्स संघ सरस ठरला आणि अव्वल स्थान गाठलं आहे. या तिन्ही संघांनी प्लेऑफची शर्यत अगदी जवळ आहे. उर्वरित 7 पैकी फक्त 3 सामन्यात विजय मिळवला की स्थान पक्कं होणार आहे. कारण 16 गुण मिळवले की स्थान पक्कं होतं.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.