बीड : बीडमधील भाजपचे लोकसभा विस्तारक बाबासाहेब आगे यांच्या हत्या मागील सत्यता आरोपीची पत्नी आणि वडिलांनी सांगितली आहे. दोघांनी सनसनी खुलासा करत अनैतिक संबंधातून ही हत्या झाल्याच्या चर्चांना पूर्णविराम लावलाय. आरोपी खोटं बोलत असल्याचं निदर्शनास आलं आहे. आता खुद्द आरोपीच्या पत्नीने याबाबत खुलासा केला आहे. मात्र, आगे कुटुंबाची बदनामी झाल्यामुळे बाबासाहेब आगे यांच्या पत्नी आणि कुटुंबाला याचा नाहक त्रास होत आहे. यामुळेच गावकऱ्यांनी याविरोधात कॅण्डल मार्च काढला होता. माजलगाव शहरातील वैष्णवी मंगल कार्यालयात सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येत आगे कुटुंबीयांसाठी शोकसभा आणि आर्थिक मदत रॅली काढली. यादरम्यान आता या प्रकरणाला वेगळाच ट्विस्ट बघायला मिळत आहे.
परंतु आता या खून प्रकरणातील आरोपी याच्या पत्नीने खरं कारण सांगितलं असून बाबासाहेब आगे हे मला भावाप्रमाणे होते, त्यांनी केवळ भाऊ म्हणून आम्हाला मदत केली. माझ्या पतीला दारुचं व्यसन आहे. यातून ते नेहमी मला शिवीगाळ करायचे. गावातील काही व्यक्तींचे नाव घेवून संशय घ्यायचे. बाबासाहेब आगे यांच्याबद्दल देखील त्यांच्या मनात संशय होता. यातूनच हा प्रकार घडला, असं नारायण फपाळच्या पत्नीनं सांगितलं. बाबासाहेब आगे हे मला भावाप्रमाणेच होते पण सांगूनही पती ऐकत नव्हते, असेही फपाळच्या पत्नीनं सांगितलं आहे.
नेमकी घटना काय?
शहरात आरोपी नारायण शंकर फपाळ याने भर दिवसा बाबासाहेब आगे यांची हत्या केली. माजलगाव तालुक्यातील किटी आडगाव ग्रामपंचायतचे सदस्य असलेले बाबासाहेब आगे हे भाजपचे तालुका अध्यक्ष अरुण राऊत यांच्या भेटीसाठी आले होते. माजलगाव शहरात स्वामी समर्थ मंदिराजवळ भाजप कार्यालय आहे, तेथे दोघांमध्ये भेट होणार होती. परंतु हीच वेळ साधून आरोपी नारायण फपाळ याने आगे यांचा खून केला.
आरोपी नारायण शंकर फपाळ याने शर्टच्या पाठीमागे कोयता लपवून आणला होता. आगे हे कार्यालयाच्या जवळ येताच त्याने कोयत्याने हल्ला केला. क्षणार्धात आगे रक्ताच्या थारोळ्यात पडले. हा सगळा प्रकार आजूबाजूचे लोक पाहत होते. त्यानंतर आरोपी नारायण शंकर फफाळ याने स्वतः माजलगाव शहर पोलीस ठाण्यामध्ये जाऊन पोलिसांना हत्येची कबुली दिली आहे. पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत आर्थिक कारणातून हत्या केली असावी, असे सांगितले गेले. परंतु पत्नीवर असलेल्या संशयातून ही हत्या झाल्याचे समोर आले आहे.