IPL 2025 vs Punjab Kings: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची इंडियन प्रीमिअर लीग २०२५ मधील घरच्या मैदानावरील पराभवाची मालिका सलग तिसऱ्या सामन्यात कायम राहिली. पावसाच्या व्यत्ययामुळे १४-१४ षटकांच्या लढतीत पंजाब किंग्सने विजय मिळवला आणि दिल्ली कॅपिटल्सनंतर १० गुण पूर्ण करणारा तो यंदाच्या पर्वातील दुसरा संघ ठरला. अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल यांच्यासह पंजाबच्या गोलंदांनी अप्रतिम गोलंदाजी केली. RCBच्या ९५ धावांवर टीम डेव्हिडने नाबाद ५० धावांची खेळी केली, अन्यथा ते इथपर्यंतही पोहोचले नसते. पंजाबला हे लक्ष्य पार करण्यासाठी संघर्ष करावा लागला, परंतु त्यांनी विजय मिळवला.
पंजाबच्या गोलंदाजांसमोर बंगळुरूच्या फलंदाजांनी लोटांगण घातले. पावसामुळे बाधित लढतीत १४ षटकांत बंगळुरूला ९ बाद ९५ धावा करता आल्या. यापैकी ५० धावा या टीम डेव्हिडच्या होत्या. त्याने १४व्या षटकात सलग तीन षटकार खेचून RCB ची लाज राखली. डेव्हिडने २६ चेंडूंत ५ चौकार व ३ षटकारांच्या मदतीने ही नाबाद खेळी केली. त्यानंतर कर्णधार रजत पाटीदार ( २३) हा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला.
फिल सॉल्ट ( ४), विराट कोहली ( १), लिएम लिव्हिंगस्टोन ( ४), जितेश शर्मा ( २) यांना नेमकी कोणती घाई लागलेली तेच समजले नाही. त्यामुळे त्यांची अवस्था ६ बाद ४१ धावा अशी झाली होती. २००८ च्या पहिल्या आवृत्तीच्या पहिल्या सामन्यात बंगळुरूवर असेच संकट ओढावले होते आणि त्या आठवणी ताज्या झाल्या. पण, नशीबाने त्यांनी आज ९० धावा क्रॉस केल्या. अर्शदीप सिंग ( २-२३), युझवेंद्र चहल ( २-११), मार्को यान्सेन ( २-१०) व हरप्रीत ब्रार ( २-२५) यांच्यासमोर चे फलंदाज ढेपाळले.
PBKS च्या फलंजादांनी घाई करण्याचा मोह टाळला. तिसऱ्या षटकात प्रभसिमरन सिंगने उत्तुंग फटका मारला होता, परंतु यश दयाल कॅचसाठी पोहचेपर्यंत चेंडू जमिनीवर पडला. दोन धावा पळून काढल्यानंतर प्रभसिमरन सिंगने सलग दोन चौकार हाणले. तिसऱ्याच्या प्रयत्नात तो टीम डेव्हिडच्या हाती झेल देऊन परतला. त्याने ९ चेंडूंत १३ धावा केल्या. दुसरा सलामीवीर प्रियांश आर्या ११ चेंडूंत १६ धावा करून चौथ्या षटकात बाद झाला.
जॉश इंग्लिस व कर्णधार श्रेयस अय्यर यांच्यावर सर्व भीस्त होती, कारण सामना एकदम अटीतटीचा होताना दिसत होता. धावांसाठी पंजाबचे फलंदाजही संघर्ष करताना दिसले. जोश हेझलवूडने त्याचा फायदा उचलताना श्रेयसला ( ७) आखूड चेंडूवर यष्टिरक्षक जितेश शर्माकरवी झेलबाद केले. त्याच षटकात इंग्लिसलाही ( १४) माघारी पाठवून हेझलवूडने RCB च्या खेळाडूंमध्ये आत्मविश्वास आणला. पंजाबने ५३ धावांवर चार विकेट्स गमावल्या होत्या.
नेहाल वढेराने ४,६ असे फटके खेचून पंजाबवरील दडपण कमी करण्याचा प्रयत्न केला. सुयश शर्माला त्याने मारलेला रिव्हर्स चौकार पाहून RCB च्या चाहत्यांनी डोक्याला हात लावला. ३० चेंडूंत ३३ धावा हव्या असताना हेझलवूडने त्याच्या तिसऱ्या षटकात केवळ दोन धावा दिल्या. त्यामुळे पंजाबला २४ चेंडूंत ३१ धावा करायच्या होत्या. हेझलवूडने ३-०-१४-३ अशी स्पेल टाकली. पण, सूयशच्या षटकात पहिल्या तीन चेंडूवर वढेराने १४ धावा जोडल्या. तरीह सामना १८ चेंडू १६ धावा असा आव्हानात्मक होता. भुवनेश्वर कुमारने पंजाबच्या शशांक सिंगला ( १) बाद करून पाचवा धक्का दिला.
वढेरा ऐकायला मागत नव्हता आणि त्याने भुवीला खणखणीत षटकार खेचून सामना एकतर्फा केला. त्यानंतर चौकार लगावून सामना १२ चेंडू ४ धावा असा जवळ आणला. वढेराने १९ चेंडूंत ३३ धावांची नाबाद खेळी केली. मार्कस स्टॉयनिसने षटकाराने मॅच संपवली. पंजाबने १२.१ षटकांत ५ बाद ९८ धावा केल्या.