निज भाषा उन्नति अहै..!
esakal April 19, 2025 11:45 AM
अग्रलेख 

प्रख्यात हिंदी साहित्यकार भारतेंदु हरिश्चंद्र हे १८५७ चा संगर घडला तेव्हा जेमतेम सातेक वर्षांचे असतील. ‘भारतेंदु’ ही त्यांची उपाधी होती. नाव हरिश्चंद्र गोपालचंद्र. त्यांच्या काळातच इंग्रज आणि त्याची भाषा यांचा बोकाळ सुरु झाला. शिपायांचे बंड चिरडल्यानंतर इंग्रज साहेबाने दमनाचा वरवंटा फिरवत आपली संस्कृती, आपली भाषा, आपल्या चालीरीती एतद्देशीयांवर लादणे अधिक गांभीर्याने घेतले, आणि ‘देशी साहेबां’च्या पिढ्यांची पैदास पद्धतशीरपणे सुरु केली. एकीकडे फारसीचा प्रभाव असलेली ऊर्दू भाषा आणि सरकारी कचेऱ्यांमध्ये चालणारी इंग्लिश भाषा या कात्रीत गोंधळून गेलेल्या सर्वसामान्य हिंदी-भाषकांसाठी भारतेंदु हरिश्चंद्र यांनी ब्रज आणि खडी बोलीचा मुक्त हस्ते वापर करत अनेक उत्तमोत्तम रचना याच काळात केल्या, काव्य रचले, नाटके लिहिली. आधुनिक हिंदी साहित्य आणि रंगभूमीचे जनक मानल्या गेलेल्या भारतेंदु हरिश्चंद्र यांना अवघे ३४ वर्षाचे आयुष्य वाट्याला आले; पण तेवढ्या काळात त्यांनी हिंदी भाषेच्या पुनरुत्थानाचा मार्ग प्रशस्त केला. त्यांनी स्वभाषाप्रेमाखातर काही दोहे रचले आहेत. त्यापैकी एक असा :

निज भाषा उन्नति अहै, सब उन्नति को मूल

बिनु निज भाषा ज्ञान के, मिटत न हिय का सूल

विविध कला शिक्षा अमित, ज्ञान अनेक प्रकार

सब देसन से लै करहू, भाषा माहि प्रचार

…निज भाषा म्हणजेच मातृभाषा हाच उन्नतीचा मूलाधार आहे, ती हृदयाची भाषा आहे. विविध कला, शास्त्रज्ञान अनंत आहे, पण ते गोळा करुन आपल्या भाषेतच सांगितले पाहिजे…असे भारतेंदुंनी लिहून ठेवले आहे. दीडशे वर्षापूर्वी भारतेंदुंनी जे त्यांच्या निजभाषेबद्दल, म्हणजेच हिंदीबद्दल लिहिले, तेच आज मराठीबद्दल लिहावे लागत आहे. पण भारतेंदु ‘हिंदी युगकर्ते’ ठरले, मराठी भाषेचा आग्रह धरणारे मात्र ‘संकुचित’! राष्ट्रीय शिक्षण धोरणातील मार्गदर्शक तत्त्वांनुसार महाराष्ट्रात पहिल्या यत्तेपासूनच प्राथमिक शाळेतच मराठीसह हिंदी भाषाही अनिवार्य करण्यात आली आहे. त्याला काही राजकीय पक्षांनी आणि शिक्षणतज्ज्ञांनीही विरोध केला आहे. देशात विविध भाषा असल्या तरी ‘एक देश, एक भाषा’ या तत्त्वानुसार हिंदी ही संपर्क भाषा म्हणून सरसकट वापरली जावी, अशी आग्रही भूमिका या निर्णयामागे दिसते. मुळात हे ‘एक देश, एक भाषा’ हे खूळ कुणाचे? आणि त्यामुळे कोणाचा लाभ होणार, हे प्रश्न आहेतच.

हिंदी ही काही आपली शत्रूभाषा नव्हे. मराठीपाठोपाठ जिभेवर सहजगत्या रुळणारी भाषा तीच आहे. ती कुठे शिकावी लागत नाही. आणि नाही शिकली, तरीही काही अडत नाही. जगातली तिसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक बोलली जाणारी भाषा हिंदीच आहे. केंद्र सरकारच्या आस्थापना, लष्कर आणि राष्ट्रीय स्तरावरल्या प्रमुख संस्थांमध्ये हिंदीचा बडिवार आहे. तरीही ती आपल्या देशाची राष्ट्रभाषा मात्र नव्हे. विविध संस्कृती, वंश, धर्म आणि भाषांमध्ये वाटल्या गेलेल्या या देशात बावीस भाषा राजमान्यताप्राप्त आहेत.

त्यापैकी एक हिंदी. ती दुसऱ्या बिगरहिंदी राज्यातील लोकांवर लादणे हा भाषास्वातंत्र्याचाच अधिक्षेप ठरतो. वेष आणि भाषा ही त्या त्या प्रांताची वैशिष्ट्ये असतात. ते वैविध्य नष्ट करुन सारे एका रंगात लपेटण्याचा हडेलहप्पी खाक्या संस्कृतीशून्यतेचेच लक्षण मानावे लागेल. दक्षिणेतील राज्यात ना हिंदीचे कौतुक, ना प्रेम. केंद्र सरकारने तेथे मात्र हिंदी अनिवार्य करण्याची हिंमत दाखवलेली नाही. पहिल्या इयत्तेपासून हिंदी अनिवार्य करण्याचा हा निर्णय भाषाशास्त्र, बालमानसशास्त्र आणि समाजशास्त्रातील निकषांवरही फोल ठरतो. महाराष्ट्र सरकारने जे मराठी भाषा धोरण अंगीकारले आहे, त्या धोरणाच्या सपशेल विरोधात जाणारी ही हिंदी-सक्ती अंतिमत: शाळकरी विद्यार्थीवर्गावरचे ओझे तेवढे होऊन बसेल.

महाराष्ट्र सरकारने मराठी भाषेला केंद्रीभूत ठेवून आपले धोरण आखले आहे. सरकारी कार्यालये आणि शाळांसारख्या ठिकाणी मातृभाषेला प्राधान्य द्यायचे हे ठरल्यावर आणखी कुठल्या तरी भाषेची सक्ती करण्याचा प्रकार पूर्णत: विसंगत आहे. ज्याला हवी त्याने हिंदी जरुर शिकावी, पण सक्ती मात्र मारक ठरणार हे नक्की. भाषांमध्ये आदानप्रदान व्हावे, साहित्य, माहिती यांची देवाणघेवाण व्हावी. संस्कृतींचे विरजण एकमेकींच्या संसारात जावे. सक्तीची भाषा मात्र या भाषिक सौहार्दाचा पहिला बळी घेईल.

जिथे संघर्ष नाही, तिथेही तो मूळ धरेल. मुळात हे असले तिरपागडे निर्णय घेण्यामागचा उद्देश तरी काय? पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना हिंदी शिकवल्यामुळे नेमका कोणाचा पाया भक्कम होणार आहे? स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तसू तसू पुढे येऊ लागल्यामुळे हे ध्रुवीकरणाचे नवे फंडे कोणी शोधते आहे काय? काही राजकीय पक्षांनी हा मुद्दा पेटवायचे इशारे दिलेच आहेत. हेच अपेक्षित होते काय? अशा असंख्य प्रश्नांच्या मोहोळात बिचारी आमची मराठी भाषा अभिजात दर्जा मिळूनही आपुल्या घरात हाल सोसतेच आहे. तिच्या उन्नतीची स्वप्ने कोण बघणार? कुठलीही भाषा सक्तीने शिकणे नको, सक्तीची भाषा तर नकोच नको. भारतेंदु हरिश्चंद्रांच्या शब्दात ‘हिय का सूल’, म्हणजेच हृदयातील खंतखेद मावळायचे असतील तर निज भाषेला पर्याय नाही.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.